coronavirus: भारत-अमेरिकेतर्फे आता आयुर्वेदिक औषधोपचार, प्रायोगिक तत्त्वावर बाधितांवर चाचण्या सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 05:43 AM2020-07-10T05:43:03+5:302020-07-10T07:32:15+5:30
भारत आणि अमेरिकेतील आयुर्वेदिक अभ्यासक आणि संशोधक संयुक्तरीत्या कोरोना विषाणू प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधे तयार करत असून, या औषधांच्या प्रायोगिक तत्त्वावर कोरोनाबाधितांवर चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी आता आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबली जाणार आहे. भारत आणि अमेरिकेतील आयुर्वेदिक अभ्यासक आणि संशोधक संयुक्तरीत्या कोरोना विषाणू प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधे तयार करत असून, या औषधांच्या प्रायोगिक तत्त्वावर कोरोनाबाधितांवर चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
भारत आणि अमेरिकेतील प्रख्यात शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक आणि डॉक्टर यांच्यासमवेत बुधवारी आॅनलाइन बैठक झाली. दोन्ही देशांतील विविध वैज्ञानिक आणि संशोधक या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीला संबोधित करताना अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू म्हणाले, या विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी दोन्ही देशांतील वैज्ञानिक समुदाय एकत्रित झाला आहे. दोन्हींच्या संस्था संयुक्त संशोधन, अध्यापन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी सहकार्य करीत आहेत.
संधू म्हणाले की, दोन्ही देशांतील आयुर्वेदिक अभ्यासक आणि संशोधक संयुक्तिकरीत्या कोविड-१९ विरुद्ध आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनच्या प्रायोगिक तत्त्वावर चाचण्या सुरू करण्याचा विचार करीत आहेत. आम्ही वैज्ञानिक पातळीवरील माहिती आणि संशोधन संसाधनांची देवाणघेवाण करीत आहोत.
इंडो-यूएस सायन्स टेक्नॉलॉजी फोरम (आययूएसएसटीएफ) विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कामांना सहयोगी उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात नेहमीच मदत करत असते. कोरोनाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी, आययूएसएसटीएफने संयुक्त संशोधन आणि स्टार्ट-अप गुंतवणुकीस पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांकडून विविध प्रस्तावांचा आढावा घेण्यात येत आहे. भारतीय औषध कंपन्या स्वस्त आणि दर्जेदार औषधे आणि लस तयार करण्यात निपुण आहेत. कोविड-१९ या साथीच्या रोगालाही प्रतिबंध करण्यासाठी भारतीय कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील काही संस्था आणि लसी बनविणाऱ्या काही महत्त्वाच्या भारतीय कंपन्यांमध्ये येत्या काळात तीन महत्त्वाचे संयुक्तिकरीत्या काम करण्याचे करार होणार आहेत. केवळ भारत आणि अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगातील नागरिकांना हे संशोधन फायदेशीर ठरणार आहे.
दोन्ही देशांत दीर्घकाळापासून सहकार्य
भारत आणि अमेरिका यांच्यात आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळापासून सहकार्य आहे. दोन्ही देशांचे संशोधक विविध आजार आणि रोगांवरील मूलभूत आणि वैधानिक स्तरावरील बाबी समजून घेऊन त्यावर निदान आणि उपचार शोधण्यासाठी एकत्रितरीत्या काम करत आहेत. भारतात सद्यस्थितीला एनआयएचने दिलेल्या फंडातून २०० पेक्षा जास्त प्रकल्प सुरू आहेत. यात एनआयएचशी संबंधित २० संस्था आणि इतर आरोग्य क्षेत्रातील मान्यवर संस्था सहभागी असून, आरोग्याशी निगडीत उपाययोजनांवर संशोधन सुरू आहे.
संयुक्त उपक्रमातून रोटा विषाणूवर लस
संयुक्त संशोधन उपक्रमात व्हॅक्सीन अॅक्शन प्रोग्राम अंतर्गत रोटा व्हायरसवर लस बनविण्यात आली आहे. या विषाणूमुळे भारतात लहान मुलांना अतिसारासारख्या आजारांचा त्रास होत असून, त्यावर ही लस प्रभावी ठरत आहे. भारतीय कंपन्यांनी अतिशय स्वस्त दरात ही लस तयार केली असून, लसीकरण विस्तारीत कार्यक्रमांतर्गत त्याचे व्यापारीकरण करण्यात आले आहे.