CoronaVirus: सिंगापूरमध्ये विदेशी कामगारांत संसर्ग वाढला; भारतीयांची संख्या लक्षणीय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:30 AM2020-04-22T02:30:37+5:302020-04-22T02:30:53+5:30
सिंगापूरमध्ये सुमारे ३ लाख विदेशी कामगार राहातात. ते प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांतील आहेत.
सिंगापूर : सिंगापूरमध्ये विदेशातून आलेल्या कामगारांच्या वस्त्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे, असे पंतप्रधान ली हसिन लूंग यांनी म्हटले आहे. तेथील विदेशी कामगारांमध्ये भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे.
ली म्हणाले, विदेशी कामगारांमध्ये विषाणूचा संसर्ग आणखी फैलावू नये म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू असून, त्याचे फलित दिसायला अजून काही दिवस जावे लागतील. बाधित विदेशी कामगारांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण हे तरुण असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सिंगापूरमध्ये सुमारे ३ लाख विदेशी कामगार राहातात. ते प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांतील आहेत. सिंगापूरमधील बांधकाम व देखभाल व्यवसायांमध्ये ते नोकऱ्या करतात. त्यांच्या सिंगापूरमध्ये स्वतंत्र वस्त्या आहेत. सिंगापूरमध्ये कोरोनाचे ९४२ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामधील ८९२ जण हे विदेशी कामगारांच्या वस्तीत राहातात. तर अन्य ठिकाणी राहाणाºया २७ विदेशी कामगारांचाही या रुग्णांत समावेश आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे सध्या ६५८०पेक्षा अधिक रुग्ण असून तिथे आतापर्यंत १० हून अधिक जणांचा बळी गेला आहे.