Coronavirus : इराणमध्ये कोरोनाची धास्ती; 70,000 कैद्यांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 08:26 PM2020-03-09T20:26:14+5:302020-03-09T21:18:32+5:30
Coronavirus : या बातमीला इराणचे ज्युडिशियरी चीफ इब्राहिम रायसी यांनी दुजोरा दिला आहे.
इराण : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराण सरकारने जेलमधील जवळपास 70, 000 हजार कैद्यांची सुटका केली आहे. याबाबतची माहिती येथील मिझान ज्युडिशियरी साइटवर देण्यात आली आहे. तसेच, या बातमीला इराणचे ज्युडिशियरी चीफ इब्राहिम रायसी यांनी दुजोरा दिला आहे.
इराणमध्ये सध्या 49 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी इराण सरकारडून अनेक प्रयत्न सुरु आहे. या कोरोना व्हायरसचा मोठा धोका टाळण्यासाठी इराण सरकारने जवळपास 70, 000 कैद्यांची तात्पुरता स्वरुपाची सुटका करण्यात आली आहे.
चीन अन् इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. चीनमध्ये सद्यस्थितीत 80,735 लोकांना संसर्ग झालेला आहे. तर 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 7375 लोकांना संसर्ग झाला असून, चीननंतर सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 266 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, भारतातही काही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 43 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.