CoronaVirus: रुग्णाला शोधणार, जंतूनाशकही फवारणार; स्मार्ट रडार 'लय भारी' कामगिरी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:51 AM2020-04-23T05:51:47+5:302020-04-23T07:30:26+5:30
इराणचे कमांडर इन चिफ हुसेन सलामी यांनी नुकताच असा दावा केला आहे, की आम्ही नुकतेच एक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तब्बल शंभर मीटर परिघातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढता येतील.
कट्टर इस्लामिक देश म्हणून इराण ओळखला जातो. संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत असताना इराणलाही आपल्या अपुऱ्या आरोग्य सुविधांसह कोरोनाशी लढा द्यावा लागतो आहे. जगात सगळ्यात जास्त ज्या देशांत कोरोनानं हाहाकार माजविला त्या प्रमुख देशांत इराणचा सध्या आठवा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे आतापर्यंत ८४ हजार ८०२ कोरोनाचे रुग्ण सापडले असून, त्यातील ५२९७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ६०,९६५ लोक बरे होऊन घरी गेले आहेत, असा इराणचा दावा आहे.
इराण व अमेरिका यांचे संबंध आधीच ताणलेले आहेत. आपल्या देशांतर्गत समस्यांनी इराण त्रस्त आहे. त्यात कोरोनानं त्यांच्याकडे उच्छाद मांडलाय. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. विज्ञानापेक्षाही पारंपरिकतेकडे इराणचा अधिक ओढा आहे. अशा काळात विज्ञानाच्या मदतीनं त्यांनाही आशेचा किरण दिसला आहे. इराणनं नुकताच दावा केला आहे की, कोणाकडूनही मदत मिळत नसली, तरी काय झालं, आम्ही कुठल्याही संकटांना तोंड देण्यास व आपत्तींचा धैर्यानं मुकाबला करण्यास सज्ज आहोत.
इराणचे कमांडर इन चिफ हुसेन सलामी यांनी नुकताच असा दावा केला आहे, की आम्ही नुकतेच एक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तब्बल शंभर मीटर परिघातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढता येतील.
हे यंत्र आपल्याभोवती चुंबकीय लहरी निर्माण करतं आणि त्यामुळे शंभर मीटर परिघातील कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेलं कोणतंही क्षेत्र शोधता येऊ शकतं. या प्रकियेला केवळ पाच सेकंद लागतात, असाही त्यांचा दावा आहे. ‘आयआरजीसी’ (इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) आणि त्याचे प्रमुख हुसेन सलामी यांचं म्हणणं आहे, हे यंत्र दूर अंतरावरून, दुरस्थपणे कार्यरत होत असले, तरी त्याची अचूकता ८० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. आम्ही या यंत्राची बऱ्याच ठिकाणी चाचणी घेतली आहे व ते परिणामकारक सिद्ध झाले आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी या यंत्राचा चांगला उपयोग होणार आहे.
हे उपकरण स्मार्ट जंतुनाशक म्हणून तर काम करेलच, पण कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात जंतुनाशक फवारणीची गरज आहे, हेही त्यामुळे कळेल. केवळ कोरोनाच नव्हे, इतर कोणत्याही विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होऊ शकेल, असा दावाही ‘आयआरजीसी’नं केला आहे. मोठा गाजावाजा करून या उपकरणाचं अनावरण केलं असलं तरी हे उपकरण कितपत उपयोगी आहे, याबाबत शंका व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. इराणमधील काही नागरिकांनीही यावर शंका व्यक्त केली असून, इराणच्या या दाव्यावर ‘हसावं की रडावं’ असा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.