coronavirus : त्या मराठी पंतप्रधानांनी थेट मोदींना केला फोन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:31 PM2020-04-22T22:31:25+5:302020-04-22T22:33:33+5:30
कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
डब्लिन - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. भारतासह जगातील प्रत्येक देशाला या संकटाची कमी अधिक झळ बसली आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
यावेळी वराडकर यांनी आयर्लंडमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारतीय वंशाचे डॉक्टर आणि नर्स करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयर्लंडमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल मोदींनी वराडकर यांचे आभार मानले. तसेच भारतात वास्तव्यास असलेल्या आयरिश नागरिकांचीही योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि डॉक्टरांवर येत असलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी स्वतः रुग्णसेवेसाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला होता. पेशाने डॉक्टर असलेले लिओ वराडकर कोरोनाचा वाढत्या फैलावाचा पार्श्वभूमीवर स्वतः वराडकर रुग्णसेवा करत आहेत. त्यासाठी त्यांचे कौतुकही होत आहे.
पेशाने डॉक्टर असलेल्या वराडकर यांनी सक्रिय राजकारणात उतरण्यापूर्वी अनेक वर्षे डॉक्टर म्हणून सेवा दिली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 मध्ये ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री बनले होते.
दरम्यान, लिओ वराडकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी डॉक्टरी पैशाची आहे. त्यांचे वडील डॉक्टर आहेत. तर आणि नर्स आहे. तर लिओ यांनीही करियर करण्यासाठी डॉक्टरी पेशाचीच निवड केली होती. पुढे ते राजकारणात उतरून आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते.