CoronaVirus: धन्यवाद प्रिय मित्रा! ट्रम्प यांच्या पाठोपाठ आणखी एका मित्रानं मानले मोदींचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 08:11 AM2020-04-10T08:11:05+5:302020-04-10T08:12:37+5:30
coronavirus हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन निर्यात करण्याच्या भारताच्या निर्णयाचं जगभरातून कौतुक
जेरुसलम: जगभरात कोरोना विषाणूचा वेगानं फैलाव होत आहे. कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे या औषधासाठी अमेरिकेसह अनेक देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता. भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी सर्व प्रमुखांनी केली होती. यानंतर भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात सुरू केली. या निर्णयानंतर ट्रम्प यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. यानंतर आता मोदी यांचे मित्र आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनीदेखील मोदींची स्तुती केली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी ट्विट करून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. नेतान्याहू यांनी ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख 'प्रिय मित्र' असा केला आहे. 'क्लोरोक्वीन पाठवल्याबद्दल माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदींचे धन्यवाद,' असं ट्विट नेतान्याहू यांनी केलं आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनीदेखील मोदींचे आभार मानले आहेत. बोल्सोनारो यांनी तर मोदींची तुलना थेट लक्ष्मणासाठी संजीवनी आणणाऱ्या हनुमानाशी केली होती.
Thank you, my dear friend @narendramodi, Prime Minister of India, for sending Chloroquine to Israel.
— PM of Israel (@IsraeliPM) April 9, 2020
All the citizens of Israel thank you! 🇮🇱🇮🇳 pic.twitter.com/HdASKYzcK4
भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला. भारतानं संकटाच्या काळात केलेली मदत विसरण्यासारखी नाही, असं म्हणत मोदींचा उल्लेख महान नेते असा केला. तर योग्य वेळी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ब्राझीलच्या अध्यक्षांनी मोदी आणि भारतीयांचे आभार मानले. भारताकडून मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात केली जाते.