Coronavirus: हा केवळ एक व्हायरस नव्हे तर अमेरिकेवर हल्ला झालाय; डोनाल्ड ट्रम्प संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:52 AM2020-04-23T10:52:14+5:302020-04-23T10:57:47+5:30
अमेरिकेत परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा संघर्ष सुरु आहे
वॉश्गिंटन – चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही संकटात अडकला आहे. या व्हायरसवरुन अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाबाबत बोलताना सांगितले की, हा त्यांच्या देशावर हल्ला झाला आहे. हा एक हल्ला आहे. फक्त फ्ल्यू नाही. आजपर्यंत कोणी असे पाहिले नाही. १९१७ मध्ये असं घडलं होतं असे ते म्हणाले.
अमेरिकेत परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा संघर्ष सुरु आहे. याठिकाणी ४७ हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ८ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. लोकांच्या आणि व्यापारांच्या मदतीसाठी अमेरिका प्रशासन अरबो रुपये प्रोत्साहन पॅकेज देत आहेत. त्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही असं ट्रम्प म्हणाले.
तसेच मी नेहमी सर्व गोष्टीमुळे चिंतेत असतो. कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्येचं निरसण करायचं आहे. जगातील सर्वाधिक चांगली अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. चीनपेक्षा उत्तम आहे. मागील ३ वर्षात आम्ही मेहनतीनं हे सर्व उभं केलं आहे आणि अचानक हा व्हायरस येतो अन् सर्व बंद करायला भाग पाडतो. आता आम्ही पुन्हा हे खुलं करत आहोत, पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने आम्ही यातून उभारी घेऊ फक्त त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
आम्ही आमच्या एअरलाइन्सला वाचवलं. अनेक कंपन्यांना मदत केली. या कंपन्यांचे कामकाज गेल्या दोन महिन्यापासून चांगल्यारितीने सुरु होतं. मात्र अचानक या संकटामुळे त्या बाजाराच्या बाहेर फेकल्या गेल्या. सध्या देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात घट होत आहे. हॉटस्पॉट ठिकाणी परिणाम चांगले दिसायला लागले आहेत. आम्ही योग्य दिशेने जात आहोत. बोस्टन, शिकागो येथे कोरोना संक्रमणचं प्रमाण कमी झालं आहे. व्हायरसशी लढण्याची रणनीती योग्य सुरु असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच लवकरात लवकर अधिक राज्य सुरक्षितरित्या पुन्हा खुली होतील असंही त्यांनी सांगितले.