Coronavirus: आनंदाची बातमी! १९ जुलैला ‘या’ देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले जाणार; विनामास्क फिरण्याची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:24 AM2021-07-06T10:24:47+5:302021-07-06T10:27:34+5:30
१९ जुलै रोजी ब्रिटनमध्ये मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि कोरोनामुळे लावण्यात आलेले सर्व निर्बंध संपुष्टात येणार आहे.
लंडन – संपूर्ण जगभरात कोरोना महामारीनं संकट उभं राहिलं आहे. कोरोनापासून बचावासाठी जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेवर अनेक देशांनी भर दिला आहे. यातच ब्रिटनमधून कोरोना आणि लसीकरणाशी निगडीत एक चांगली बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनावरील निर्बंध जवळपास पूर्ण हटवण्यात आले आहेत. आता ब्रिटनमधील लोक विनामास्क आणि सोशल डिस्टेंसिंगशिवाय बाहेर फिरू शकतात.
लसीकरणाच्या बळावर कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावातही ब्रिटन मास्क फ्री देश बनणार आहे. १९ जुलै रोजी ब्रिटनमध्ये मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि कोरोनामुळे लावण्यात आलेले सर्व निर्बंध संपुष्टात येणार आहे. ब्रिटीश सरकार या दिवसाला फ्रीडम डे म्हणून साजरा करण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी याबाबत घोषणा केली आहे.
पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, आम्ही सोशल डिस्टेंसिंग, मास्क सारखे सर्व नियम येत्या काही दिवसांत संपवणार आहोत. जर कुणी या नियमांचे यापुढेही पालन करत असतील तर त्यांना आम्ही रोखणार नाही. कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची प्रक्रिया १९ जुलैपासून सुरू होईल. परंतु याबाबत अंतिम निर्णय १२ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चौथ्या टप्प्यात केवळ मास्क, सोशल डिस्टेंसिंग नव्हे तर इतर निर्बंधही हटवण्यात येतील. नाईट क्लब, म्युझिक कॉनसर्ट, लग्न समारंभ, सिनेमा हॉल आणि सर्व व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत ६४ टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सरकार लसीकरणाच्या बळावरच नियमांना हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु इतिहास पाहिला तर कोरोना काळात ज्या ज्या देशांनी निर्बंधात सूट दिली त्याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर अशी स्थिती पुन्हा उद्भवणार नाही अशी अपेक्षा आहे. कोरोना या जगातून लवकरच नष्ट होईल अशी आशा सगळ्यांना वाटत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे १ लाख २८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. डेल्टा व्हायरसमुळे कोरोना संक्रमणात वाढ झाल्याचं दिसून आलं.