Coronavirus:‘लोकं मरू द्या, अर्थव्यवस्था महत्त्वाची!’ कामावर जा, हस्तांदोलन करा, सेल्फी काढा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:20 AM2020-05-07T00:20:57+5:302020-05-07T07:14:45+5:30
लॉकडाऊनविरोधात जे लोक आवाज उठवत होते, आंदोलन करत होते, त्यांनाही बोल्सोनारो यांनी बळच पुरवलं.
ब्राझील - ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूवर म्हणावं तसं नियंत्रण आणण्यात ब्राझिलियन सरकारला अजूनही यश आलेलं नाही, याचं कारण त्यांचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो हे स्वत:च त्याबद्दल गंभीर नाहीत.
बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची अधिकृत संख्या होती एक लाख १६ हजार. ४८ हजार २२१ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आलं होतं, तर मृतांची संख्या होती ७ हजार ९६६ इतकी. बोल्सोनारो यांनी कोरोना विषाणूला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही. एकीकडे सगळं जग लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय अवलंबत असताना त्यांनी त्याचीही खिल्ली उडवली.
लॉकडाऊनविरोधात जे लोक आवाज उठवत होते, आंदोलन करत होते, त्यांनाही बोल्सोनारो यांनी बळच पुरवलं. खुद्द त्यांचं आरोग्य खातं लोकांना घरी बसण्याचं आवाहन करीत असताना बोल्सोनारो मात्र त्यांना कामावर जाण्याचा सल्ला देताहेत. यासंदर्भातलं त्याचं म्हणणं आहे, कोरोनामुळे काही लोक तर मरतील, पण त्यापेक्षाही अर्थव्यवस्था वाचविणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यापुढे जाऊन ते म्हणतात, थोडीशी सर्दी झाली, खोकला झाला, तर त्यानं लगेच कोरोनाची टेस्ट करायची, उगाचच मास्क लावायची गरज नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेलं उदाहरणही मोठं आश्चर्यजनक आहे. बोल्सोनारो म्हणाले होते, वाहनांमुळे अनेक अपघात होतात, लोकं मरतात, म्हणून कारच्या फॅक्टऱ्या बंद करायच्या का? बोल्सोनारो यांनी सगळेच ‘कोरोना नियम’ धाब्यावर बसविताना परवा झालेल्या रॅलीत लोकांना पुन्हा आवाहन केलं, कामावर जा, हस्तांदोलन करा, सेल्फी काढा!