CoronaVirus Live Updates : बापरे! एका वर्षात तब्बल 4 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाली तरुणी; दरवेळी दिसली 'अशी' लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 03:23 PM2022-01-26T15:23:20+5:302022-01-26T15:32:48+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: एका वर्षात तरुणीला तब्बल चार वेळा कोरोनाची लागण झाली आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 35 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 359,575,171 वर पोहोचली आहे. तर 5,635,704 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. आधी डेल्टा आणि आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला एकदा, दोनदा नव्हे तर चार वेळा कोरोनाने गाठलं आहे.
एका वर्षात तरुणीला तब्बल चार वेळा कोरोनाची लागण झाली आहे. chinapress.com च्या रिपोर्टनुसार यूकेमध्ये राहणाऱ्या व्हार्टनला (Wharton) सप्टेंबर 2020 मध्ये कोरोना झाला होता. त्यावेळी ती नोकरी करत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी फेस मास्क असायचा तरी कोरोनाने तिला आपल्या विळख्यात घेतलं. तिला सर्दी झाली होती. नाकातून सतत पाणी यायचं. त्यावेळी तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं आणि काही दिवसांनी तिने कोरोनावर मात केली. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
जानेवारी 2021 मध्ये व्हार्टनचे पालक कोरोना पॉझिटिव्ह झाले. दोघंही वेगवेगळ्या रूममध्ये होते. तेव्हा व्हार्टनचीही कोरोना चाचणी करण्यात आली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आढळली. यावेळी तिला ताप नव्हता पण तिचं नाक गळत होतं. यावेळीही तिने कोरोनाविरोधातील लढा जिंकला. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊन एक महिनाही झाला नाही ती तिसऱ्यांदा कोरोनाच्या विळख्यात सापडली. अमेरिकेला जात असताना तिची टेस्ट करण्यात आली तेव्हा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. यावेळी तिला साधा सर्दी-खोकला होता.
तीन वेळा कोरोना होऊन गेल्यानंतर व्हार्टनने कोरोना लस घेतली. लशीचे दोन्ही डोस घेतले. आता ती आपल्या बुस्टर डोसची प्रतीक्षा करत होती तर तिला पुन्हा म्हणजे चौथ्यांदा कोरोना झाल्याचं निदान झालं. यावेळीही तिला होम क्वारंटाईन करण्यात आलं. पण यावेळी तिच्यामध्ये कोणतीच लक्षणं नाहीत. पण एका वर्षातच चार वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने लोकही हैराण झाले आहेत. व्हार्टन म्हणाली, कदाचित यावेळी व्हायरस कमजोर झाला असावा. तिच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.