CoronaVirus तब्बल १८० देशांमध्ये लोकल ट्रान्समिशन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:34 AM2020-04-09T05:34:29+5:302020-04-09T05:34:59+5:30
‘कोरोना’चे २११ देशांत अस्तित्व : ८३ देशांमध्ये बाधितांचा आकडा शंभराच्या आत
विशाल शिर्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जगभरातील २११ देशांमध्ये कोरोना (कोव्हिड-१९) विषाणूचे अस्तित्व आढळले आहे. त्यातील तब्बल १८० देशांमध्ये कोरोनाचा स्थानिक प्रसार सुरू असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे. त्यात भारतासह अमेरिका, चीन, कोरिया, इराण, फ्रान्स, इटली आणि इतर युरोपियन देशांचादेखील समावेश आहे. यातील ८३ देशांमध्ये बाधितांचा आकडा शंभराच्या आत आहे.
जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी (दि. ७) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार : १२ लाख ७९ हजार ७२२ व्यक्ती कोरोनाबाधित होत्या, तर ६८ हजार ७६६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. बुधवारी दुपारपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत १२ लाख ८२ हजार ९३१ पर्यंत वाढ झाली. तर, मृतांची संख्यादेखील ७२ हजार ७७४ पर्यंत वाढली.
युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. भारत, जपानसह आशिया आणि इराणसह मध्यपूर्व देशांमध्ये बाधितांची संख्या काही हजारात गेली आहे. भारतामध्ये मंगळवारअखेरीस बाधितांची संख्या ४ हजार ६७ वर पोहोचली होती. या भागातील १८० देशांमध्ये रोगाचा स्थानिक प्रसार सुरू झाला आहे. मंगोलिया, भूतान, हैती, निकारागुआ यांसारख्या २३ देशांमध्ये परदेशी आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती बाधित आहेत. तर, ८ देशांमध्ये बाधितांची काही प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, त्यांना बाधा कशी झाली, याचा तपास अद्याप सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या जगातील २११ देशांपैकी ३१ देशांमध्ये बाधितांचा आकडा शंभराहून कमी आहे. तर, ५२ देशांमध्ये बाधितांची संख्या २० हून कमी आहे. यातील ३० देशांमध्ये बाधितांचा आकडा दहाच्या आत आहे.
जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?
४कम्युनिटी ट्रान्समिशन (समाजातील प्रसार) : समाजाच्या सर्व स्तरांमधून आणि सर्व भागांतून मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येणे. अगदी सामान्य तपासणीत देखील रोगाचे अस्तित्व जाणवणे
४लोकल ट्रान्समिशन (स्थानिक प्रसार) : एखाद्या जिल्हा आणि प्रांतातील ठराविक ठिकाणामध्ये रुग्ण आढळणे. असा भाग सहज वेगळा काढता येणे.
४इम्पोर्टेड केस (बाहेरून आलेले) : परदेशाहून आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची बाधा होणे.
४अंडर इन्व्हिस्टिगेशन : एखाद्या विशिष्ट भागामध्ये रोगाचा प्रसार नक्की कसा झाला, याची निश्चिती न होणे.
अजून कम्युनिटी ट्रान्समिशन नाही
४जागतिक आरोग्य संघटनेने २११ देशांमध्ये कोरोनाचा अस्तित्व असल्याचे सांगितले आहे. अगदी अमेरिका, चीन, इटली, जर्मनी या देशांतही संपूर्ण समाजामध्ये (कम्युनिटी ट्रान्समिशन) रोगाचा प्रसार झाला नसल्याचे सांगितले आहे.