Coronavirus: निर्बंध उठविताना काळजी न घेतल्यास पुन्हा लॉकडाऊन; देशांना सावध राहण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:47 PM2020-05-07T23:47:01+5:302020-05-08T07:11:58+5:30
निर्बंध शिथिल केल्यास किंवा टप्प्याटप्प्याने हटविल्यास पुन्हा या साथीची लागण होण्याचा धोका कितपत आहे, याचा अंदाज घ्या.
जीनिव्हा : ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध विविध देशांनी टप्प्याटप्प्याने मागे घेताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची पाळी त्या देशांवर येऊ शकते, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी दिला.
अमेरिका, चीन, ब्रिटनसह काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंध काही ठिकाणी शिथिल करण्याचे तसेच काही ठिकाणी ते टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचे ठरविले आहे. या देशांना सावधानतेचा इशारा देताना जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रेसिस म्हणाले, ‘‘कोणत्याही देशाने लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या महाभयंकर साथीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्यव्यवस्था अतिशय सक्षम बनवावी.’’
निर्बंध शिथिल केल्यास किंवा टप्प्याटप्प्याने हटविल्यास पुन्हा या साथीची लागण होण्याचा धोका कितपत आहे, याचा अंदाज घ्या. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यासाठी पावले टाका, अशी महत्त्वपूर्ण सूचनादेखील घेब्रेसिस यांनी लॉकडाऊन हटविण्याची इच्छा बाळगणाऱ्या देशांना केली. कोरोना विषाणूचा माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाºया संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने जगाला गेल्या जानेवारीमध्येच सावध केले होते. मात्र, बहुतांश देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या या सूचनेकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही.
‘कोविड-१९’वरून अमेरिका-चीन वाद
या साथीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने चीनला नेहमीच झुकते माप दिले, असा आरोप अमेरिकेने केला होता. त्यानंतर या संघटनेला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखला. दुसरीकडे, चीनने या संघटनेला काही प्रमाणात निधी दिला.
कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील एका प्रयोगशाळेत झाली असल्याचे पुरावे आपल्या हाती लागले आहेत, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाम्पेओ यांनी केला होता. मात्र, त्यांचा हा दावा चीनने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावताना असा आरोप करणारे पॉम्पेओ हे अविवेकी असल्याची टीका केली होती. ‘कोविड-१९’च्या साथीमुळे अमेरिकेत प्रचंड वित्त व जीवित हानी झाली. यामुळे अमेरिका चीनवर सतत आगपाखड करीत आहे. दोन्ही देशांतील वादंगाने सध्या उग्र रूप धारण केले आहे.