Coronavirus: शांघायमध्ये कडक लॉकडाऊन; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर WHO चा सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:51 PM2022-03-28T16:51:52+5:302022-03-28T16:53:08+5:30
भारतात सध्या कोरोना महामारी आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमधून बरे होण्याचं प्रमाण ९८.७५ टक्के इतकं झाले आहे.
युरोप आणि पूर्व आशियातील कोरोना विषाणूची लाट कमी होताना दिसत नाही. चीनमधील शांघायमध्ये पुन्हा दोन टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. २.६ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात आता नऊ दिवस चाचणी वाढवण्यात येणार आहे. युरोपीय देशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दोन्ही ठिकाणी Omicron चा सब व्हेरिएंट BA.2 मुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफताली बेनेट हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
भारतात सध्या कोरोना महामारी आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमधून बरे होण्याचं प्रमाण ९८.७५ टक्के इतकं झाले आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरुकता निर्माण झाल्यानं आता कोविडची कॉलर ट्यून लवकरच बंद होण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहे. चीन पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. सोमवारी, चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायच्या मोठ्या भागात लॉकडाऊन लागू केले. यासोबतच शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुडोंग आणि त्याच्या आसपासच्या भागात सोमवार ते शुक्रवार लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. शांघायमधील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शहराचे विभाजन करणाऱ्या हुआंगपू नदीच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन सुरू होणार आहे.
WHO नं दिला इशारा
जागतिक आरोग्य संघटना (WHO) मधील कोविड-१९ चे टेक्निकल प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटलं की, कोरोना विषाणू हा आजार नेहमीच्या फ्लूसारखा राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की तो धोकादायक नाही. आता हार मानण्याची वेळ नाही. आता महामारी संपली असं म्हणण्याची वेळ नाही. दुर्दैवाने, असं नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक देशातील सर्वात जोखीम असलेल्या लोकांपर्यंत लसीकरण वाढवावे लागेल. यासोबतच प्रसार रोखण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करावा लागेल.
भारतात चाचणी कमी झाली अन् रुग्णसंख्येतही घट झाले
रविवार असल्याने कोरोना व्हायरसच्या चाचणीत मोठी कमतरता होती. देशभरात केवळ ४.५ लाख लोकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी १२७० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या काळात संसर्गाचे प्रमाण ०.२९ टक्के नोंदवले गेले आहे. गेल्या २४ तासांत १५६७ रुग्ण कोरोना विषाणूतून बरे झाले असून ३१ जणांना त्याचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत ३२८ सक्रिय रुग्ण कमी झाले आणि आता फक्त १५,८५९ सक्रीय रुग्ण आहेत. दुसरीकडे रिकव्हरी रेट चांगला होत आहे. आता भारतात रिकव्हरी ९८.७५ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्यूदर १.२१ टक्के आहे.