coronavirus: लॉकडाऊन काढल्यास अमेरिकेत अनेक मृत्यू होतील, मोठे आर्थिक नुकसानही होण्याचा व्यक्त केला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 05:43 AM2020-05-14T05:43:53+5:302020-05-14T05:44:27+5:30
लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील राज्य आणि शहरांतील कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे.
खरा धोका हा आहे की, या संसर्गजन्य रोगाचा फैलाव एवढा होईल की, तो आटोक्यात आणणे कठीण होईल, असा इशारा डॉ. फॉसी यांनी संसदीय समिती आणि अमेरिकेला दिला आहे. त्यांनी दिलेला इशारा राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध आहे. अमेरिकेतील २४ राज्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन हटविणे सुरू केले आहे.
लॉकडाऊनमुळे अमेरिकेत जवळपास तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाल्याने ट्रम्प प्रशासन राज्यांतील व्यवहार सुरू करण्यावर भर देत आहे.
असोसिएटेड प्रेसच्या आढाव्यानुसार अमेरिकेतील १७ राज्य निर्बंध शिथिल करण्यासंबंधीचे व्हाईट हाऊसचे निकष पूर्ण करीत नाहीत. कारण या राज्यांत संसर्गाचा दर १४ दिवसांत कमी होताना दिसत नाही.
नवीन रूग्ण वाढतील
कोरोना रोगाच्या जगव्यापी साथीचे गांभीर्य स्पष्ट करताना डॉ. फॉसी आणि अन्य तज्ज्ञांनी घरूनच संसदेच्या आरोग्य, शिक्षण, कामगार समितीपुढे निवेदन केले.
लोक घरांतून काम, धंदा आणि अन्य व्यवहारांसाठी बाहेर पडल्यास संसर्गित नवीन रुग्णांची संख्या वाढेल आणि अधिक लोक मृत्यू पावतील.
संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केल्यास नवीन रुग्ण आढळणार नाहीत; परंतु लॉकडाऊनचे निर्बंध हटविल्यास त्याचे गंभीर परिणाम होणे निश्चित आहे.