CoronaVirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांहून अधिक, दुबईत लॉकडाऊनचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 07:30 AM2020-04-05T07:30:06+5:302020-04-05T07:31:19+5:30
CoranaVirus : अमेरिकेत २४ तासांत १४८० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही कोरोनामुळे ३ लाखांहून अधिक जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर, आतापर्यंत ७ हजार,९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
अमेरिकेत २४ तासांत १४८० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेपाठोपाठ युरोपीयन देशांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर, दुबईत सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दुबई दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये १४ हजार, ७०० तर स्पेनमध्ये ११ हजार, ८०० लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये (६,५००), ब्रिटन (४,३१५), इराण (३,५००), जर्मनी (१,३३०), नेदरलँड (१,६५०) तर बेल्जीयम (१,३००) असे मृत्यू झाले आहेत. चीनमध्ये मात्र गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे केवळ चारच जणांचा मृत्यू झाला असून तेथील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १,३२६ एवढी झाली आहे.
जगातील सुमारे २०० देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये ८ लाख, ५० हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील ४० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, ८ लाख, ११ हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.