Coronavirus : सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लस उपलब्ध करा- अँटोनिओ गुटेरस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 03:47 AM2020-04-26T03:47:54+5:302020-04-26T07:04:00+5:30
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत त्या लसी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केले आहे.
न्यूयॉर्क : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी सध्या प्रयोग सुरू आहेत. या लसींना जागतिक स्तरावर सार्वजनिक हिताच्या गोष्टी म्हणून मान्यता देण्यात यावी. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत त्या लसी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केले आहे.
अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुटेरस म्हणाले की, कोरोनावर कोणीही प्रतिबंधक लस तयार केली, तर तिचा वापर एखाद्या देशापुरता किंवा प्रदेशापुरताच मर्यादित राहू नये. त्या लसीला जागतिक स्तरावर सार्वजनिक हिताची वस्तू म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. ती लस जगातील प्रत्येक माणसासाठी उपलब्ध असायला हवी.
गुटेरस यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, जगाला कोरोना साथीपासून मुक्त करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. या विषाणूसंदर्भातील माहिती, संशोधनाचे निष्कर्ष जगातील सर्व देशांनी परस्परांना दिले पाहिजेत. मानवतेचे काम करताना राजकारण बाजूला ठेवावे.
शुक्रवारी झालेल्या या समारंभाला जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेसिस, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मार्कोन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सूला व्हॉन देर लेयेन, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेटस् व त्यांच्या पत्नी मेलिंडा आदी मान्यवर उपस्थित होते.
>संकटावर मात करणारच
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस म्हणाले की, जागतिक नेते, खासगी कंपन्या, शास्त्रज्ञ, मानवतावादी कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र मिळून कोरोनाविरोधात लढा दिला पाहिजे. अशा प्रयत्नातूनच कोरोनाच्या भीषण संकटावर विजय मिळविता येईल.