CoronaVirus : धक्कादायक! पतीनं लपवली कोरोनाची लक्षणं; गर्भवती पत्नीसुद्धा झाली संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 07:06 PM2020-04-01T19:06:15+5:302020-04-01T19:07:27+5:30
जगभरातून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे.
न्यूयॉर्कः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, संक्रमितांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे जगभरातून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. लॉकडाऊन असतानाही बऱ्याचदा लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतरही काही जण डॉक्टरकडे जात नाहीत. अशा गोष्टी ते लपवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. पत्नी गर्भवती असतानाही पतीनं कोरोनाबाधित असल्याची माहिती लपवली, त्यामुळे पत्नीसुद्धा आता कोरोनानं संक्रमित झाली आहे.
usatoday.comच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये हे प्रकरण उघडकीस आलं आहे. पत्नी प्रसूतिगृहात होती अन् पती तिला भेटण्यासाठी आला होता. प्रसूतीनंतर पत्नीची तपासणी केली असता तिच्यात कोरोनाची लक्षणं आढळली. न्यूयॉर्कच्या स्ट्राँग मेमोरिअल रुग्णालयात हा प्रकार घडला असून, रुग्णालय प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे. त्यामुळे आता रुग्णालयात येणाऱ्या व्हिजिटर्सची स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. व्हिजिटर्सला आता रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी सर्जिकल मास्क घालावं लागणार आहे. पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर पतीनं स्वतः कोरोनाबाधित असल्याचं सांगितलं आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रुग्णालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, मुलाच्या जन्माच्या काही वेळानंतर आईमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्याचदरम्यान पतीनंसुद्धा त्याला कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगितलं. रुग्णालय प्रशासनानं अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा 4,000 वर जाऊन पोहोचला. अमेरिकेतील मृतांचा हा आकडा 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्यापेक्षाही मोठा आहे. अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनामुळे तेथे तब्बल 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी कोरोना वायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 190,000 लोक संक्रमित झाले आहेत.