वुहानच्या प्रयोगशाळेत बनला मानवनिर्मित कोरोनाचा विषाणू; नोबेल पुरस्कारविजेत्याच्या दाव्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:19 AM2020-04-20T02:19:00+5:302020-04-20T07:17:20+5:30
नोबेल पुरस्कारविजेत्या फ्रेंच शास्त्रज्ञाचा दावा
पॅरिस : जगामध्ये सध्या हाहाकार माजवत असलेला कोरोनाचा विषाणू हा मानवनिर्मित आहे. एड्सवरील प्रतिबंधक लस शोधण्याकरिता चिनी प्रयोगशाळेत सुरू असलेल्या संशोधनात हा विषाणू निर्माण करण्यात आला, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते व फ्रान्सचे विषाणू तज्ज्ञ लुक मॉन्तानिए यांनी केला आहे. त्यामुळे जगभर खळबळ माजली आहे.
एड्स विषाणू्च्या संशोधनाबद्दल लूक माँटेग्नर व दोन शास्त्रज्ञांना २००८ मध्ये मेडीसिन या विषयासाठीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता. लुक मॉन्तानिए यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, कोरोनाच्या विषाणूमध्ये एचआयव्हीचे अंश व मलेरियाचे जंतूही आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूची नैसर्गिकरीत्या उत्पत्ती झालेली नाही या संशयाला बळकटी मिळते. मात्र, मॉन्तानिए यांचा हा दावा पॅरिसमधीलच काही विषाणूतज्ज्ञांनी फेटाळून लावला आहे.
मॉन्तानिए यांनी सांगितले की, वुहान राष्ट्रीय जैवसुरक्षा प्रयोगशाळेत (डब्ल्यूएनबीएल) कोणाकडून तरी अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असावा. त्यानंतर या विषाणूने जगात अनेकांचे बळी घेतले. कोरोनाच्या विषाणूची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत झाली होती का, याचा अमेरिका तपास करत आहे असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले.
कोरोनाचा विषाणू वातावरणात मिसळला कसा? त्याने अमेरिकेसह काही देशांत इतके भयंकर तांडव कसे केले, या सगळ्या गोष्टींचा आम्ही छडा लावणार आहोत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनीही म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर मॉन्तानिए यांनी केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे. ते म्हणाले की, संसर्गजन्य रोग पसरविण्याची मोठी ताकद असलेले अनेक विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेत आहे याची अमेरिकेला नीट कल्पना आहे.
लुक मॉन्तानिए यांचे काही संशोधन वादग्रस्त
नोबेल पुरस्कारविजेते असले, तरी लुक मॉन्तानिए यांचे काही संशोधन वादग्रस्तही ठरले आहे. डीएनएमधून बाहेर पडणाऱ्या विद्युतलहरी, पपई ही पार्किन्सन, एड्स या आजारांवरील उपचारांत गुणकारी आहे, अशा विषयांवर मॉन्तानिए यांनी लिहिलेल्या शोधनिबंधातील निष्कर्षांवर काही शास्त्रज्ञांनी कडाडून टीका केली होती.
चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील : डोनाल्ड ट्रम्प
कोरोना विषाणूची साथ पसरण्यास चीनने जाणूनबुजून केलेली कृत्ये कारणीभूत असल्यास त्याचे गंभीर परिणाम या देशाला भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिला आहे. ते म्हणाले की, कोरोना साथीच्या प्रारंभीच्या टप्प्यात ती थांबविता येणे चीनला शक्य होते, पण त्यांनी ते केले नाही. त्याचा खूप मोठा फटका जगाला सहन करावा लागत आहे. एखादे कृत्य मुद्दामहून करणे व हातून चूक होणे या दोन गोष्टीत खूप फरक असतो. जाणूनबुजून चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना अद्दल घडवायला हवी. कोरोना विषाणू व साथीबद्दलची अमेरिकेला हवी असलेली सविस्तर माहिती चीनने कधीच दिली नाही. आम्हाला या प्रकरणापासून दूर ठेवले. कोरोना साथीने जगाला तडाखा दिल्यानंतर, त्याची चीन आता चौकशी करत आहे. त्यांच्या चौकशीत काय निघते, याकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.