CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 03:11 PM2020-05-05T15:11:22+5:302020-05-05T15:14:19+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 69,925 बळी घेतले आहेत.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 252,675 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 36 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,660,055 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,203,850 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 69,925 बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 29 हजार 079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 25 हजार 428 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 हजार 201 जणांचा तर ब्रिटनमध्ये 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात 1,571, जर्मनीत 6,993, रशियामध्ये 1,451, चीनमध्ये 4,633, इराणमध्ये 6,277, तुर्कीमध्ये 3,461जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे 1,154 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोना (कोविड-19) बाधितांची संख्या वेगाने वाढत असली तरी, कोरोनाला परताविणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्यांमधे अगदी सोळा दिवसांच्या नवजात अर्भकापासून ते नव्वदीवरील ज्येष्ठ व्यक्तींचाही समावेश आहे. जगभरातील दहा लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाला परतावून लावले आहे. बाधितांपैकी जवळपास 97 टक्के रुग्णांमधे कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 1074 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे आता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 27.52 टक्के असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.