CoronaVirus Live Updates : कोरोनाने लग्नाचे वाजवले बारा! 2 वेळा टळलं अन् आता...; तरुणीने पंतप्रधानांना लिहिलं पत्र, केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:08 AM2021-12-23T10:08:46+5:302021-12-23T10:37:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या कित्येक जोडप्यांना कोरोनामुळे बऱ्याच काळापासून वाट बघावी लागली आहे.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याच दरम्यान कोरोनाने लग्नाचे बारा वाजवले आहेत. अनेकांनी आपले विवाह सोहळे हे पुढे ढकलेले आहेत. तर काहींनी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत उरकून घेतले आहे. लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या कित्येक जोडप्यांना कोरोनामुळे बऱ्याच काळापासून वाट बघावी लागली आहे.
अनेक लोक तर असे आहेत ज्यांच्या लग्नाच्या तारखा ठरलेल्या असतानाही पुढे ढकलाव्या लागल्या. तर यामुळे काही लोकांचं लग्नही रद्द झालं आहे. अशात आपलं दुःख नेमकं कोणाला सांगावं, असा प्रश्न या जोडप्यांना पडला. एका ब्रिटीश तरुणीने तर आपलं हे दुःख थेट देशाच्या पंतप्रधानांनाच सांगितलं आहे. त्यांच्याकडे तक्रार केली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. येथे एका तरुणीचं लग्न कोरोनामुळे दोन वेळा टळलं आहे. आता तिसऱ्यांदा लग्नाची तारीख ठरली आहे, मात्र पुन्हा एकदा ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसारामुळे देशात कडक नियम केले जात आहेत.
'18 महिन्यांत तिसऱ्यांदा तारीख ठरलीय पण...'
लग्नाच्या काही दिवस आधी या तरुणीने आपलं दुःख थेट पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सांगितलं आहे. 30 डिसेंबरला या तरुणीचं लग्न होणार आहे. 18 महिन्यांत तिसऱ्यांदा त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली गेली आहे. मात्र देशात पुन्हा कडक नियम लागू होत असल्याने तिसऱ्यांदा हे लग्न टळण्याच्या मार्गावर आहे. माझे वडील आणि सासऱ्यांचं वय अधिक असल्याने ते लग्नात येणं टाळत आहेत. सर्व वयस्कर लोकांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची भीती आहे. रिसेप्शनमध्येही 55 लोकांच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे. अशात जर पाहुणे आले नाहीत तर हे नुकसान कोण भरेल. फुलंही ऑर्डर केली आहेत आणि म्यूजिशियनही बुक केले आहेत असं तरुणीने म्हटलं आहे.
पाहुण्यांना येण्यासाठी बसही बुक केली असून बहुतेकाचं पेमेंटही झालं आहे. लोकांना आणण्यासाठी ट्रेन तिकीटचं बुकिंगही झालं आहे. लोकांचे कपडेही खरेदी केले गेले आहेत यात सर्वासाठी भरपूर खर्च झाला आहे. मात्र अजूनही सरकारने खरोखर असलेल्या अवस्था आमच्यासमोर मांडली नाही तर आम्ही कशी व्यवस्था करायची. शेवटच्या क्षणी सरकारने काहीतरी नियम लागू केल्यास आम्हाला हे सर्व रद्द करावं लागेल आणि मोठं आर्थिक नुकसान होईल, असं देखील या तरुणीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.