चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला 30 दिवसांचा अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:45 PM2020-05-19T13:45:15+5:302020-05-19T13:52:58+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच चीनने धमक्या दिल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना संर्दभातली माहिती लपवून ठेवल्याचा धक्कादायक आरोप अमेरिकेने केला आहे. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेला करण्यात येणारी मदतही रोखण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रोस अॅडॅनॉम यांना पत्र लिहून धोरणं सुधारण्याची विनंती केली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाबाबात वारंवार दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचा आरोप देखील त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.
येत्या 30 दिवसांत चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने हे सिद्ध न केल्यास जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी कायमचा रोखण्यात येईल असा इशारा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
This is the letter sent to Dr. Tedros of the World Health Organization. It is self-explanatory! pic.twitter.com/pF2kzPUpDv
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 19, 2020
कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटाना चीन केंद्रित काम करत असल्याचा आरोप केला होता. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी रोखण्याचा निर्णय देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सीआयएने दावा केला आहे की, चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती कशी लपवली आणि दोघांनी नक्की कोणत्या प्रकारची योजना आखली होती यासंर्दभातील सर्व पुरावे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जर कोरोनाची माहिती ताबडतोब जाहीर केली तर आम्ही कोरोना संक्रमणाच्या तपासणीत सामिल होणार नाही, अशी चीनने धमकी दिली होती. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जगाला अलर्ट करण्यात उशिर केला असा आरोप अमेरिकेने केला आहे.