CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा चुकला?; जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं कोरोनाचं खरं उगमस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:09 PM2020-05-02T12:09:49+5:302020-05-02T12:14:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 63,871 बळी घेतले आहेत.
चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्भव कसा झाला व ती साथ जगभरात कशी पसरली याचा अमेरिका सखोल तपास करत आहे असल्याचे डोनल्ड ट्रम्प यांनी सांगितले. मात्र डोनल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर आता जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने स्पष्टीकरण दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक माइकल जे. रयान म्हणाले की, कोरोना व्हायरस नैसर्गिकरित्या निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनेक वैज्ञानिकांनी याबाबत चर्चा केली. त्यानंतर कोरोना हा विषाणू नैसर्गिकरित्याच निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे.
चीनमधून फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर धुमाकूळ घातला असून, दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. एखाद्याच्या चुकीमुळे जर अनेकांचा जीव जात असेल तर त्या कृत्याचा संबंधितांना जाब विचारायलाच हवा. पण जागतिक आरोग्य संघटनेने असे काहीही केले नाही. चीनच्या बाजूने बोलत राहाण्यात या संघटनेने धन्यता मानली असल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर देखील नाराजी दर्शवली होती.
वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 63,871 बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाग्रस्तांची संख्या 1,095,304 वर पोहचली आहे.