Coronavirus: जगातील बाधितांची संख्या एक कोटीच्या पुढे; 'या' ३८ देशांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:00 AM2020-06-29T02:00:42+5:302020-06-29T07:07:55+5:30
मृत्यूचा विचार केला तर सर्वाधिक १.२९ लाख मृत्यू मार्च महिन्यात झाल्याचे दिसते. त्यानंतरच्या महिन्यांत संसर्गाचे प्रमाण वाढत गेले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत गेल्याचे ही आकडेवारी सांगते.
नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी रात्री एक कोटीचा टप्पा पार केला. ‘वल्डोमीटर’ने केलेल्या मोजणीनुसार हा आकडा आता एक कोटी ४५ एवढा झाला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या महामारीचा सर्वप्रथम उगम झाल्यापासून अवघ्या सहा महिन्यांत या विषाणूचा एवढा प्रचंड प्रसार झाला आहे.
उन्हाळा सुरु झाला की साथीचा जोर कमी होईल हा जाणकारांनी व्यक्त केलेला अंदाजही खोटा ठरला. एक कोटी बाधितांपैकी सुमारे ७५ टक्के रुग्णांना मे आणि जून या गेल्या दोन महिन्यांत संसर्ग झाला. जूनमध्ये जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज सरासरी १.२५ लाखांनी वाढ झाली आहे. बहुतेक सर्वच देशांनी एक ते तीन महिन्यांचे ‘लॉकडाऊन’ लागू केले. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्था पार डळमळल्या. त्या सावरण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केल्यावर विषाणूने पुन्हा जोमाने डोके वर काढल्याचे आकडेवारीवरून दिसते.
मृत्यूचा विचार केला तर सर्वाधिक १.२९ लाख मृत्यू मार्च महिन्यात झाल्याचे दिसते. त्यानंतरच्या महिन्यांत संसर्गाचे प्रमाण वाढत गेले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत गेल्याचे ही आकडेवारी सांगते.
३८ देशांनी केली कोरोनावर मात
तुवालू, वानुआतू वसॉलोमन आयलँड््स यासारख्या छोट्या बेटांसह एकूण ३८ देशांनी अनेक महिन्यांच्या लढ्यानंतर या साथीवर पूर्ण मात केली आहे किंवा मात करण्याच्या ते बेतात आहेत. चीननेही कोरोनामुक्ती जाहीर केली होती. परंतु थोड्या खंडानंतर तेथे पुन्हा रुग्ण आढळणे सुरु झाले होते. न्यूझीलंडनेही कोरोनावर मात केल्याचे जाहीर केले. पण तेथेही नंतर काही नवे रुग्ण आढळले होते. श्रीलंकेने आता तेथे एकही नवा रुग्ण नसल्याचे म्हटले आहे तर भूतानमधील रुग्णसंख्या फक्त सातवर आली आहे.