Coronavirus : कोरोनामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी, ट्रम्प यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:27 AM2020-03-15T05:27:42+5:302020-03-15T05:28:52+5:30
कोरोनोची साथ जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही पावली उचलली आहेत. कोरोनामुळे जगभरात पाच हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील ४१ बळींचा समावेश आहे.
वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. या साथीचा मुकाबला करण्यासाठी ५० अब्ज डॉलरचा निधीही अमेरिकी सरकारने मंजूर केला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाने आणखी १३ जण मरण पावले असून त्यामुळे तेथील बळींची संख्या ३,१८९वर पोहोचली आहे.
कोरोनोची साथ जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही पावली उचलली आहेत. कोरोनामुळे जगभरात पाच हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील ४१ बळींचा समावेश आहे.
अमेरिकेतील ५०पैकी ४५ राज्यांत कोरोनाची लागण झाली आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, कोरोनाच्या साथीचा झपाट्याने होणारा फैलाव लक्षात घेता आगामी आठ आठवडे अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी यासंदर्भातील वैद्यकीय चाचणी मी लवकरच करून घेणार आहे असेही ते म्हणाले. अमेरिकेतील बंदरांमधून क्रूझची होणारी जलवाहतूक शनिवारपासून पुढील एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना प्रवास टाळण्याच्या सूचना
अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे कारण नसेल तर त्या देशांतर्गत किंवा अन्य देशांत जाणे टाळावे अशी सूचना तेथील भारतीय दूतावासाने केली आहे. कोरोनाची वैद्यकीय चाचणी मोफत करण्याचे तसेच नोकरदारांना आजारपण व कौटुंबिक कारणांसाठी भरपगारी रजा देण्याबद्दलचे विधेयक अमेरिकेच्या लोकप्र्रतिनिधी गृहात शनिवारी मंजूर करण्यात आले. हे विधेयक अमेरिकी सिनेटमध्ये पुढील आठवड्यात संमतीसाठी मांडण्यात येईल.
आयएमएफचा एक कर्मचारी कोरोनाग्रस्त
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) वॉशिंग्टन येथील मुख्यालयातल्या एका कर्मचाऱ्यालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. व्हेनेझुएला या देशामध्ये प्रथमच कोरोनाचे दोन रुग्ण शुक्रवारी आढळून आले. या देशामध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता असून ही साथ मोठ्या प्रमाणावर पसरल्यास त्या स्थितीचा मुकाबला कसा करणार याची चिंता तेथील नागरिकांना भेडसावत आहे.
अॅपलची स्टोअर २७ मार्चपर्यंत बंद
चीनमध्ये कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या ८०,८२४वर पोहोचली आहे. सध्या १२,०९४ लोकांवर रुग्णालयांत उपचार सुरू असून ६५, ५४१जणांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयांतून घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. चीन वगळता अन्य देशांतील आपली स्टोअर २७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अॅपलने घेतला आहे.
मास्कच्या निर्यातीबाबत इस्रायल पंतप्रधानांची मोदींना विनंती
कोरोनाची वाढती साथ लक्षात घेता मास्क, औषधनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल यांची इस्रायलमध्ये निर्यात करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मास्क, औषधनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल यांची भारतात टंचाई जाणवू नये म्हणून त्यांची निर्यात थांबविण्याचा निर्णय मोदी सरकारने नुकताच घेतला होता.
त्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी या आठवड्यात मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोरोनासंदर्भात सार्क परिषदेतील आठ देशांची व्हिडीओ कॉन्फरन्स व्हावी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला प्रस्ताव पाकिस्तानने मान्य केला आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजता ही कॉन्फरन्स होणार आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी सुरु केले ‘रिमोट शासन’ पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने खबरदारी
ओटावा: पत्नीला कोरोना विषाणुची लागण झाल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी स्वत:लाच ‘क्वारेंटाईन’ लागू केले आहे. परिणामी त्रुदेऊ यांनी अन्य कोणाच्याही संपर्कात न येता घरी बसून देशाचा शासनव्यवहार ‘रिमोट’ पद्धतीने सुरु ठेवला आहे.
जस्टिन त्रुदेऊ यांच्या पत्नी सोफी ग्रेगरी ब्रिटनहून परतल्यावर त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना साथीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सोफी यांच्यात फ्ल्यूची सौम्य लक्षणे दिसून आली व आता त्यांची प्रकृती ठीक आहे.. मात्र आपल्याला स्वत:ला व मुलांना त्यांच्याकडून कोणताही संसर्ग झालेला नाही, असे त्रुदेऊ यांनी सांगितले.
त्रुदेऊ यांनी सहकारी मंत्री व अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली व व्हिडिओ बैठका घेऊन कोरोनाला आळा घालण्याचे नवे उपाय व निधीची तरतूदीविषयी निर्णय घेतले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मर््कॉन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इटलीचे पंतप्रधन गुसेप कॉन्ते या परदेशी नेत्यांशीही फोनवरून चर्चा केली.
कॅनडा सरकारने मोठी गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘हाऊस आॅफ कॉमन्स’ या संसदेचे कामकाज पाच आठवड्यांसाठी बंद ठेवले आहे. परदेशांतून येणारी विमानेही ठराविक ठिकाणी उतरविली जात आहेत.