CoronaVirus : सिंगापूरमध्ये 4800 भारतीयांना कोरोनाची बाधा, उच्चायुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:08 PM2020-05-04T15:08:02+5:302020-05-04T15:09:47+5:30
CoronaVirus : सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जवळपास 4800 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सिंगापूर : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान, सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जवळपास 4800 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली आहे. सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या विदेशी नागरिकांसह भारतीय मोठ्या संख्येने डॉरमिट्रीमध्ये राहतात. सिंगापूरमध्ये आतापर्यंत 18205 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली आहे.
भारतीय कामगारांमध्ये कोरोनाची लक्षणं जवळपास सर्व सौम्य आहेत. तसेच, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, असे सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त जावेद अशरफ यांनी सोमवारी सांगितले. सिंगापूरमध्ये अनपेक्षितरित्या दीर्घ मुक्काम झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह 3500 हून अधिक भारतीयांनी घरी परतण्यासाठी आणि जेवणाची सोय करावी, या मागणीसाठी उच्च आयोगाकडे नोंदणी केली आहे, असेही जावेद अशरफ यांनी सांगितले. याशिवाय, कोरोनाची लागण झालेल्या 4800 भारतीयांपैकी जवळपास 90 टक्क्यांहून अधिक लोक कामगार आहेत. जे बहुतेक विदेशी कामगारांच्या डॉरमिट्रीमध्ये राहतात, असेही जावेद अशरफ म्हणाले.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका, स्पेन, इटली या देशांसह जगभरातील देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत असून मृतांचा आकडा सुद्धा जास्त आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांची संखा रोजच वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी देशात केंद्र सरकारने तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.