CoronaVirus News: नवीन उपचार पद्धतीमुळे होणार फिजिकल डिस्टन्सिंगपासून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:13 AM2020-08-15T03:13:51+5:302020-08-15T06:50:09+5:30
अमेरिकी शास्त्रज्ञांचा दावा; पुढील वर्षी अंमलबजावणी होण्याची शक्यता
वॉशिंग्टन : कोरोना संसर्गावर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी जगभरात प्रयोग सुरू असतानाच, या आजारावर नवी उपचार पद्धती शोधण्यासाठी अमेरिकी शास्त्रज्ञ विविध प्रयोग करीत आहेत. ते यशस्वी झाल्यास पुढील वर्षीच्या प्रारंभापासून ही नवी उपचार पद्धती लागू करण्यात येईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना किंवा न झालेल्यांना फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची गरज उरणार नाही. ते मनात कोणतीही भीती न बाळगता सर्वत्र संचार करू शकतील.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर होऊ नये, तसेच त्याचा जीव वाचविण्यावर या उपचार पद्धतीत कटाक्ष ठेवण्यात आला आहे. कोरोनाची साथ जगात पसरून सात महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या संसर्गामुळे जगभरात लाखो लोक बळी पडले आहेत. सर्वात मोठी हानी अमेरिकेमध्ये झाली आहे. जगामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिका, ब्राझील व भारतामध्ये आहेत. या आजारावर प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, त्या लसीच्या गुणवत्तेविषयी इतर देशांतील शास्त्रज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.
कोरोनावरील नव्या उपचार पद्धतीमध्ये सार्स ब्लॉक थेरपीचाही समावेश होतो. सिथेंटिक प्रोटिन सिक्वेन्सवर आधारित नवी उपचार पद्धती विकसित करण्यासाठी अमेरिका व ब्रिटनमधील काही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर पैशाची गुंतवणूक केली आहे. शरीरातील पेशींमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव होण्यापासून या नव्या उपचार पद्धतीद्वारे प्रतिबंध केला जाईल. ही उपचार पद्धती त्या विषाणूची ओळखही पटवील व त्याच्याशी लढा देण्यासाठी शरीरात आवश्यक तितकी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करील.
अद्याप रामबाण औषध उपलब्ध नाही
कोरोना संसर्गावर सध्या एकही रामबाण औषध वा लस उपलब्ध नाही. हा आजार झालेल्या रुग्णांना सध्या देण्यात येणाऱ्या काही औषधांचा गुण येत असला तरी जगभरात आणखी परिणामकारक औषध शोधण्यासाठी प्रयोग सुरूच आहेत.
कोरोनाला आळा घालण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला जात आहे.
मात्र, त्यापेक्षा अधिक सुलभ उपचार पद्धती शोधण्याकडे अमेरिकेसह काही प्रगत देशांतील शास्त्रज्ञांचा कल आहे.