Coronavirus: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं धोका वाढला; वाढत्या रुग्णसंख्येमुळे WHO नं दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:42 AM2022-03-24T09:42:11+5:302022-03-24T09:42:32+5:30
पाश्चात्य देशांत कोरोना महामारीनं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मागील आठवडाभरात याठिकाणी कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांत कोरोना संक्रमणाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. जोपर्यंत जगातील सर्व देशांत लसीकरण प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर कोविड १९ संक्रमण आणि त्याचे नवनवीन व्हेरिएंटशी लढावं लागणार असल्याचं WHO नं सांगितले आहे.
WHO चे टेड्रोस एडनॉम घेब्रियियस म्हणाले की, आपण सर्व कोरोना महामारीच्या पुढे जाऊ इच्छितो. आपण कोरोनापासून जितकंही दूर जावो ही महामारी संपत नाही. जोपर्यंत जगातील सर्व देशांत कोरोना लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण होत नाही. तोपर्यंत कोरोना संक्रमण आणि त्याच्या नवीन व्हेरिएंटचा धोका सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे कोरोना महामारी संपुष्टात आली असा कुणीही गैरसमज करून घेऊ नका असं त्यांनी सांगितले आहे.
७ टक्के रुग्णवाढ
पाश्चात्य देशांत कोरोना महामारीनं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मागील आठवडाभरात याठिकाणी कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र कोविड १९ मुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी झाला आहे. कोविड १९ रुग्णसंख्येत जागतिक वाढ पाहायला मिळत आहे. त्याचे कारण आशियात महामारीचा वाढता प्रकोप आणि यूरोपात आलेली लाट आहे. अनेक देशांत महामारीच्या सुरुवातीनंतर आता जास्त मृत्यू होत आहेत. मृत्यूचा आकडा ओमायक्रॉन पसरत असल्याने वाढत आहे. त्याचसोबत ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका वाढला आहे.
७० टक्के लोकांचं लसीकरण होणं गरजेचे
संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेचे प्रमुख म्हणाले की, WHO चं लक्ष्य यावर्षीच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचं लसीकरण करणं हे आहे. ज्यात आरोग्य कर्मचारी, वृद्ध आणि अन्य जोखीम असलेल्या व्यक्तींना लसीकरणात प्राधान्य द्यावं.
तसेच हाय इन्कम असणाऱ्या देशांनी लोकांना बूस्टर डोसही देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु आतापर्यंत जगातील एक तृतीयांश लोकसंख्येचे लसीकरण झाले नाही. अनेक देशांत कोरोना लसीकरण तुलनेने खूप कमी आहे. नायजेरिया पुरवठा झाल्यानंतर लसीकरणाला वेग आला आहे. जगात १२ मिलियनपेक्षा अधिक नवीन रुग्ण आठवडाभरात आढळले आहेत. मृत्यू दरात २३ टक्क्यांनी घट झाली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं दिसून आले. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कारण अनेक देशांनी कोरोना निर्बंध हटवले आहेत.