CoronaVirus News : लाॅकडाऊन जाहीर हाेताच ७०० किमी वाहतूककोंडी; कोरोना कहरामुळे युरोपात प्रचंड घबराट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 02:30 AM2020-11-01T02:30:21+5:302020-11-01T06:06:06+5:30
CoronaVirus News in Europe : युरोपात ठिकठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. दररोज बाधितांचे आकडे वाढत आहेत. फ्रान्स त्यात आघाडीवर असून रोज ५० हजार बाधित आढळू लागले आहेत.
पॅरिस : कोरोनाची दुसरी लाट येताच चिंतित झालेल्या फ्रेंच सरकारने देशव्यापी लाॅकडाऊन जाहीर केला. या घाेषणेनंतर धास्तावलेल्या अनेकांनी गावाकडे धाव घेतल्याने पॅरिसबाहेर तब्बल ७०० किमी लांबीची वाहतूककोंडी झाली होती.
युरोपात ठिकठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. दररोज बाधितांचे आकडे वाढत आहेत. फ्रान्स त्यात आघाडीवर असून रोज ५० हजार बाधित आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी देशव्यापी लॉकडाऊन लागू केला. हा लॉकडाऊन महिनाभर चालेल. त्यामुळे धास्तावलेल्या अनेक पॅरिसवासीयांनी शहराबाहेर जाण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोकांनी दुकानांमध्येही गर्दी केल्याचे चित्र होते. फ्रान्सबरोबरच जर्मनी आणि बेल्जियम या देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याने संपूर्ण युरोपात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती पसरली आहे. (वृत्तसंस्था)
दिल्लीतही स्थिती गंभीर
राजधानी दिल्लीतही कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे.