Bill Gates : "जगात कोरोनासारखी आणखी एक महामारी येणार"; बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 09:11 AM2022-02-21T09:11:24+5:302022-02-21T09:22:21+5:30
Bill Gates And Corona Virus : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आता एक गंभीर इशारा दिला आहे.
जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी आता एक गंभीर इशारा दिला आहे. लवकरच कोरोनासारखी आणखी एक महामारी जगात येऊ शकते, असं म्हटलं आहे. कोविड-19 पासून गंभीर आजारी पडण्याचा धोका नाट्यमयरित्या कमी झाला आहे. कारण लोकांमध्ये या व्हायरसविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होत असल्याने हे घडत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
बिल गेट्स यांनी CNBC ला मुलाखत दिली. भविष्यात येणारी महामारी ही कोरोना व्हायरसच्या प्रकारातील एका वेगळ्या व्हायरसपासून येऊ शकते. मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीच्या मदतीने जग अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करावी लागेल, असंही ते म्हणाले. कोरोना गेल्या दोन वर्षांपासून आपल्यामध्ये आहे आणि त्याचा वाईट परिणाम आता कमी होत असल्याचं देखील सांगितलं.
जागतिक लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्तीची पातळी काही प्रमाणातच निर्माण झाल्यामुळे हे घडत आहे. नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे व्हायरसची तीव्रताही आता कमी झाल्याचे दिसून आले आहे. व्हायरस पसरतो तेव्हा तो स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. पण आता जागतिक समुदायाची व्हायरसविरोधातील प्रतिकारशक्ती वाढल्याने ही सवय लसीपेक्षा अधिक प्रभावी ठरली आहे, असं बिल गेट्स म्हणाले.
नवीन व्हेरिएंट BA.2 ओमाक्रॉनपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा
भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहेत. पण ओमाक्रॉनच्या BA.2 च्या सब-व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट BA.2 ओमाक्रॉनपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा आहे. वेगवेगळ्या अभ्यासातून हे समोर आले आहे. ओमाक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2 डेल्टा पेक्षा अधिक धोकादायक असू शकतो आणि त्यामुळे कोरोनाचा गंभीर आजार होऊ शकतो, असेही अभ्यासात आढळून आले आहे. या व्हेरिएंटने चिंता वाढली आहे, असं महामारी तज्ज्ञ एरिक फेंग यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा BA.2 व्हेरिएंट किती आहे घातक?
कोरोनाचा BA.2 व्हेरिएंटला स्टेल्थ ओमायक्रॉन असंही म्हणतात. BA.2 हा गंभीर आजार निर्माण करण्यास सक्षम आहे. पण त्याचा पूर्ण अभ्यास होणं बाकी आहे. BA.2 हा Omicron चा subvariant म्हणून ओळखला जातो, पण त्याच्या जिनोमची रचना BA.1 पेक्षा लक्षणीयरित्य भिन्न आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.