Coronavirus News: अवघ्या 8 दिवसांत बांधलं 1000 बेड्सचं हॉस्पिटल; चीनचा 'चमत्कार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 11:13 PM2020-02-02T23:13:04+5:302020-02-03T00:33:16+5:30
कोरोनो व्हायरसमुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित केलेला आहे.
बीजिंग: कोरोनो व्हायरसमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित केलेला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत 270हून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. चीनमधलं वुहान शहर या व्हायरसचं केंद्रबिंदू असून, चीनमध्ये कोरोना व्हायरसनं बाधित असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चीनमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून, तिकडची सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
चीन सरकारनं एका आठवड्यात कोरोना व्हायरसबाधित रुग्णांसाठी 1000 बेड्सच हॉस्पिटल निर्माण केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत या हॉस्पिटलमधून उपचार मिळण्यास सुरुवात होणार आहे. या हॉस्पिटलचं वेगानं काम सुरू असून, ते जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 23 जानेवारीला या हॉस्पिटलच्या निर्माणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. चीन ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कनं या हॉस्पिटलच्या निर्माणाचं सीसीटीव्ही फुटेज जारी केलेलं आहे. हॉस्पिटल तयार होत असलेल्या ठिकाणी लायनिंग सामग्री ठेवणाऱ्या लॉरी दिसत आहेत. तसेच अनेक जण खोदकाम करत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळतंय. या हॉस्पिटलचा बेस तयार झालेला दिसत असून, काम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे.
रिपोर्टनुसार, हॉस्पिटल परिसरात अनेक इमारतींचा समावेश आहे. 25,000 चौरस मीटर परिसरात हे हॉस्पिटल पसरलेलं असून, त्याच्या निर्माणासाठी 1400 जवान कार्यरत आहेत. हॉस्पिटल आता सैन्याची वैद्यकीय सेवा सांभाळणाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं असून, सोमवारपासून कोरोना व्हायरसच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे, असं सीजीटीएनने सांगितलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी जॉइंट लॉजिस्टिक सपोर्ट फोर्सशी संबंधित असलेले 950 वैद्य आणि पीएलएच्या सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या वैद्यकीय विद्यापीठांमधील 450 कर्मचारी हॉस्पिटलमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. हॉस्पिटलमध्ये साथीच्या आजारापासून बचाव व घटनास्थळावरच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यासाठी 15 तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे.
शनिवारपर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 14,411 रुग्ण सापडलेले आहेत. मागील काही दिवसांत चिनीमध्ये या व्हायरसनं हातपाय पसरलेले असून, 5 दशलक्षाहून अधिक लोकांनी वुहान शहरच सोडले. चीनने कोरोना व्हायरसबाधित शहरांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला असून, सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घातली आहे. तसेच व्हायरसबाधित भागातील रुग्णांना वेगळं ठेवून व्हायरसचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत, अमेरिका, श्रीलंका आणि इतर बर्याच देशांनी वुहानमधून नागरिकांना बाहेर काढून मायदेशी नेले आहे.Mission complete! 110s time-lapse video shows the construction of Wuhan’s Huoshenshan Hospital from Jan 23 to Feb 2. pic.twitter.com/cIw7SjxqHx
— People's Daily, China (@PDChina) February 2, 2020