CoronaVirus News: कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:03 PM2021-05-07T12:03:08+5:302021-05-07T12:07:07+5:30
CoronaVirus News: संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना चीन सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांच्या अडचणींत वाढ
नवी दिल्ली: भारतात कोरोनाचं थैमान सुरू आहे. मे महिन्यात तीन दिवस देशात ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे परदेशांमधून भारताला मदत मिळत आहे. तर भारतातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात सुरू आहे. मात्र चीननं घेतलेल्या एका निर्णयाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. भारतात मोठ्या प्रमाणात औषधांचं उत्पादन होतं. देशातून जगभरात औषधं पुरवली जातात. मात्र चीनच्या एका निर्णयामुळे जगभरात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे रुग्ण, 2 कोटींचा टप्पा केला पार
चीननं मालवाहू विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. यासोबतच भारताकडून औषधांची आयात करणाऱ्या देशांसमोरही समस्या निर्माण झाली आहे. अमेरिका औषधांसाठी मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. भारताकडून औषधं आयात करणाऱ्या देशांची संख्या खूप मोठी आहे. मात्र चीननं कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्यानं भारतातील औषध निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात औषधांची टंचाई निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोर
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चीननं सरकारी विमान कंपनी सिचुआन एअरलाईन्सच्या मालवाहू विमानांची उड्डाणं रोखली. याबद्दल भारतीय औषधं निर्मिती संघाचे अध्यक्ष महेश दोषी यांनी चिंता व्यक्त केली. भारतात तयार होणाऱ्या औषधांसाठीचा ६० ते ७० टक्के कच्चा माल चीनहून येतो. त्यामुळे चीननं घेतलेल्या निर्णयाचा परिणाम औषध उत्पादनांवर होऊ शकतो अशी भीती दोषी यांनी व्यक्त केली. यासंदर्भात दोषी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २९ एप्रिलला पत्र लिहिलं आहे.