CoronaVirus News: चीन आगामी दिवसांत कोरोनाच्या लसीबाबत करणार मोठी घोषणा; शास्त्रज्ञांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:06 AM2020-06-09T11:06:56+5:302020-06-09T11:22:29+5:30
कोरोनावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी लसीच्या प्रयोगाचा पहिला, दुसरा टप्पा सुरू आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे. जगभरात आतापर्यंत ७१ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ लाख ८ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. त्यातच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
चीनमधील डेली मेलच्या वृत्तानूसार, चीनमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच चीन कोरोनाच्या लसीबाबत मोठी घोषणा करणार असल्याचा दावा चीनच्या कोरोनाविरोधी उपाययोजनांचे प्रमुख असणारे डॉ. झोंग नानशान यांनी केला आहे. तसेच घोषणा केल्यानंतर कोरोनावरील लसी सप्टेंबरपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती झोंग नानशान यांनी दिली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी लसीच्या प्रयोगाचा पहिला, दुसरा टप्पा सुरू आहे. ही कौतुकाची बाब असली तरी यापुढे वाटचाल करताना औषधनिर्माण उद्योग, अभ्यासक, संशोधन केंद्रे तसेच जैवतंत्रज्ञान क्षेत्र या सर्वांचा आपसांत समन्वय असणे आवश्यक आहे. अनेक प्रकारची आकडेवारी सांगून या साथीबाबत दिलासा देणे विविध पातळींवरून सुरू आहे. मात्र, लशीचा शोध लागेल तो दिवस खऱ्या अर्थाने दिलासा देणारा असेल, असे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग विभागातील लस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जॉन मस्कोला यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, जगातील रुग्णसंख्या 71 लाखांवर गेली, तर मृत्यूच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. भारतातही लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झालेली असतानाच कोरोनाचे हजारांवर 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 56 हजारांवर पोहचली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus News: दिलासादायक! राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात
10 जूनपासून नवा नियम लागू; 'या' बँकेतील ग्राहकांना होणार फायदा