CoronaVirus News: कोरोनाच्या संकटामुळे येमेनमधील लहान मुलांवर उपासमारीची पाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 04:20 AM2020-06-27T04:20:09+5:302020-06-27T04:20:18+5:30
कोरोना संकटामुळे सध्या या गरीब व दारिद्र्यरेषेखालील मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना स्वयंसेवी वा सरकारी संस्थांकडून मदत मिळणे दुरापास्त होऊ न बसले आहे.
कैरो : कोरोनाच्या उपचारांसाठी आणि त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जगातील सर्वच देशांचा खर्च वाढत असल्याने अनेक आवश्यक खर्च करणेही देशांना शक्य होताना दिसत आहे. सतत युद्धाच्या खाईत लोटल्या गेलेल्या येमेनचीही स्थिती अशीच आहेत. कोरोनामुळे त्या देशातील २४ लाख लहान मुले उपासमारीच्या संकटात लोटली जातील, असा इशारा युनिसेफने दिला आहे. कोरोना संकटामुळे सध्या या गरीब व दारिद्र्यरेषेखालील मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना स्वयंसेवी वा सरकारी संस्थांकडून मदत मिळणे दुरापास्त होऊ न बसले आहे. त्यामुळे येमेनमधील मुलांना दोन वेळचे जेवण मिळणेही अवघड होत आहे. यावर्षाअखेर येमेनमध्ये अशी उपासमार होणाऱ्या मुलांची संख्या २४ लाखांवर गेलेली असेल, असे युनिसेफच्या एका विशेष अहवालात नमूद करण्यात आले आहे. येमेनमधील आरोग्य व्यवस्था आधीच कोलमडून पडली आहे. कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी त्या देशाकडे पायाभूत सुविधा आणि पैसा नाही. येमेनला काही देश आतापर्यंत आर्थिक मदत करीत होते. पण कोरोना संसर्गामुळे त्या देशांनी येमेनला अर्थसाह्य करणे जवळपास थांबविले आहे. त्याचा परिणाम या लहान मुलांवर होत आहे. कोरोनाशी लढायचे की मुलांना जेवू घालायचे, हा प्रश्न येमेनपुढे आहे, असे युनिसेफचे म्हणणे आहे. या देशाला ताबडतोब अर्थसाह्य मिळाले नाही तर या मुलांची उपासमार प्रचंड वाढेल. त्यामुळे सर्वांनी या देशाला मदत करावी, असे आवाहन युनिसेफच्या येमेनमधील प्रतिनिधी सारा बेलोसोव न्यान्ती यांनी म्हटले आहे.