CoronaVirus News : लस शोधण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी, मॉडर्ना कंपनीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:22 AM2020-05-20T00:22:43+5:302020-05-20T05:32:06+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : या अमेरिकन कंपनीच्या दाव्यानंतर लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण जगाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलेल्या कोविड-१९ या महामारीवर उपाय म्हणून लस शोधण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेतील एका कंपनीने सोमवारी केला. या अमेरिकन कंपनीच्या दाव्यानंतर लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण जगाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ अर्थात ‘एनआयएच’च्या नियंत्रणाखाली हे परीक्षण पार पडले. लशीच्या मनुष्यावरील पहिल्या परीक्षणाचे निष्कर्ष मॉडर्ना कंपनीने सोमवारी प्रथमच जाहीर केले. यातील सहभागी ४५ स्वयंसेवकांना लस टोचल्यानंतर त्यांच्यात कोरोना विषाणूच्या संसर्गापासून रक्षण करणारी प्रतिकारक्षमता तयार झाली. अशा प्रकारचे आणखी काही परीक्षण तातडीने करण्यात येणार आहेत. जेणेकरून आत्यंतिक गरज भासल्यास या लशीचा वापर करता येईल, असे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.
या लशीच्या उंदरांवरील परीक्षणासाठी ‘एनआयएच’चे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख कंपनीने आवर्जून केला. उंदरांना ही लस टोचल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांनी संसर्ग रोखण्याच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. लस तयार करण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू करण्यात येणार आहे. जुलैमध्ये परीक्षणाचा तिसरा टप्पा घेण्यात येईल. २५ मायक्रोग्रॅम या सर्वांत कमी मात्रेचे डोस घेणाºया १५ स्वयंसेवकांच्या रक्तातील अॅन्टीबॉडी आणि कोविड-१९च्या संसर्गातून बºया झालेल्या रुग्णाच्या रक्तातील अॅन्टीबॉडी यांचे प्रमाण सारखे आहे.
असे झाले परीक्षण
- या परीक्षणात १८ ते ५५ वर्षे वयोगटातील ४५ स्वयंसेवकांचा समावेश होता. पहिल्या टप्प्याचे हे परीक्षण करताना स्वयंसेवकांच्या आरोग्याची सुरक्षा हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता. याला बºयापैकी यश लाभल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्वयंसेवकांना २५, १०० आणि २५० मायक्रोग्रॅमच्या ३ मात्रांपैकी कोणत्याही एका मात्रेचे २ डोस देण्यात आले. यामुळे सर्वांच्या शरीरात अॅन्टीबॉडी तयार झाल्या. तिन्ही मात्रांचे डोस घेणाºया स्वयंसेवकांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती विकसित झाल्याचे दिसून आले, असा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे.