CoronaVirus News: ...तर कोरोना संकटाची तीव्रता होईल कमी; जगभरातील तज्ज्ञांनी सांगितला रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:13 AM2021-05-30T10:13:01+5:302021-05-30T10:13:47+5:30
जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; कोरोनाच्या आणखी लाटा येण्याची शक्यता
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या भविष्यात अनेक लाटा येण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचबरोबर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याने प्रत्येक लाटेबरोबर कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत जाईल असे मत जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना साथीला रोखण्याचा लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असून त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लस देणे आवश्यक आहे. दिल्लीतील डॉक्टर अंबरीश सात्विक यांनी सांगितले की, जोपर्यंत ही साथ रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना होणार नाही, तोवर कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढत राहणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर शंकरा चेट्टी यांनी सांगितले की, जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत कृष्णवर्णीयांमध्ये या साथीचा मोठा फैलाव झाला होता. मात्र, आता कृष्णवर्णीयांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिचा परिणाम आधीच्या लाटांपेक्षा नक्कीच कमी असेल. या वर्षाच्या अखेरीस कोरोना रुग्णांच्या संख्येत खूप मोठी घट झाल्याचे सर्वांना पहायला मिळेल. या विषाणूसोबतच यापुढे जगावे लागणार आहे. मात्र, या विषाणूचा पूर्वीइतका त्रास कोणालाही होणार नाही.
काय आहे सामूहिक प्रतिकारशक्ती?
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर नैसर्गिकरीत्या निर्माण होणारी सामूहिक प्रतिकारशक्ती तसेच लस देऊन निर्माण झालेली सामूहिक शक्ती असे दोन प्रकार आहेत.
कोरोनाच्या विषाणूचे मानवी शरीरात उत्परिवर्तन होते. ते दाराचे हँडल, रेलिंग किंवा हवेत असताना होत नाही.
एकूण लोकसंख्येच्या विशिष्ट प्रमाणातील लोकांना विषाणूचा संसर्ग होऊन त्यांच्यात नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली किंवा लसीमुळे ही प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर त्याला सामूहिक प्रतिकारशक्तीचे रूप येते. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कमी होतो.