CoronaVirus News: अ‍ॅस्ट्राझेनिसाच्या लसीच्या मानवी चाचण्या काही काळ थांबविल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:19 AM2020-09-10T00:19:26+5:302020-09-10T07:07:16+5:30

ही लस बनविण्यात यश येणारच, अशी आशा लावून बसलेल्यांची या घडामोडींमुळे निराशा झाली आहे.

CoronaVirus News: Human trials of the AstraZeneca vaccine have been suspended for some time | CoronaVirus News: अ‍ॅस्ट्राझेनिसाच्या लसीच्या मानवी चाचण्या काही काळ थांबविल्या

CoronaVirus News: अ‍ॅस्ट्राझेनिसाच्या लसीच्या मानवी चाचण्या काही काळ थांबविल्या

Next

न्यूयॉर्क : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनिसा या कंपनीच्या संयुक्त संशोधनातून कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याचे प्रयोग एक स्वयंसेवक या लसीच्या दुष्परिणामांमुळे आजारी पडल्याने काही काळ थांबविण्यात आले आहेत. त्याला नेमका कोणता आजार झाला आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ही लस बनविण्यात यश येणारच, अशी आशा लावून बसलेल्यांची या घडामोडींमुळे निराशा झाली आहे. अ‍ॅस्ट्राझेनिसा या कंपनीने एका पत्रकात म्हटले आहे की, ही लस किती सुरक्षित आहे, याचा आढावा घेण्यासाठी काही काळ संशोधन प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. असे पाऊल का उचलले हे अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीने जाहीर केलेले नाही. मात्र, स्वयंसेवकाला या लसीमुळे गंभीर आजार झाला असावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

याबाबत काही वेबसाइट्सनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये या लसीच्या मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम झाल्याचे आढळले. गेल्या महिन्यात या लसीच्या अमेरिकेतील मानवी चाचण्यांसाठी अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीने ३० हजार स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया सुरू केली होती. या लसीच्या मानवी चाचण्या ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेमध्येही सुरू होत्या.

अमेरिकेमध्ये अ‍ॅस्ट्राझेनिसाव्यतिरिक्त फायझर, मॉडेर्ना या दोन कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत. हजारो स्वयंसेवकांवर मानवी चाचण्या सुरू असताना काही लोकांना त्याचे काही परिणाम जाणवणे हे अपेक्षितच आहे. त्याची पूर्ण तपासणी करण्यासाठी अ‍ॅस्ट्राझेनिसाने मानवी चाचण्या काही काळ थांबविल्या आहेत.



हा योगायोगही असू शकतो
एखादा आजारी पडणे हा इतक्या मोठ्या मानवी चाचणी प्रक्रियेतील योगायोगही असू शकतो, असे अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीने म्हटले आहे. अ‍ॅस्ट्राझेनिसा व आॅक्सफर्ड विद्यापीठ विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा दुष्परिणाम जाणवलेल्या स्वयंसेवकाला त्यामुळे गंभीर आजार झाला असावा. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असावी, अशी शक्यता आहे.

Web Title: CoronaVirus News: Human trials of the AstraZeneca vaccine have been suspended for some time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.