CoronaVirus News: कोरोना लस पुरवठ्याबद्दल कोणीही भारताला लेक्चर देऊ नये; फ्रान्सचे पंतप्रधान कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:39 PM2021-05-09T15:39:25+5:302021-05-09T15:40:07+5:30
CoronaVirus News: भारतानं जगाला लसींच्या माध्यमातून मानवता निर्यात केली, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठिशी; फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रन यांच्याकडून कौतुक
नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महत्त्वाच्या राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू असतानाही देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारत बायोटेक आणि सीरमनं आंतरराष्ट्रीय करार केल्यानं त्यावरही मर्यादा येत आहेत. लसींच्या पुरवठ्यावरून फ्रान्सचे पंतप्रधान इम्यॅनुएल मॅक्रन ठामपणे भारताच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
“राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”
कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून भारताला कोणाचंही लेक्चर ऐकण्याची गरज नाही, असं इम्यॅनुएल मॅक्रन म्हणाले. ते युरोपियन युनियनच्या व्हर्च्यअल परिषदेत बोलत होते. भारतानं जगातल्या अनेक देशांना लसी पुरवल्या असून या माध्यमातून त्यांनी मानवतेची निर्यात केली आहे, अशा शब्दांत मॅक्रन यांनी भारताचं कौतुक केलं. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या सर्व २७ देशांनी जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत प्रवासावर सवलत देण्याची भूमिका घ्यावी. यामुळे प्रत्येकाला कोरोनाची लस कमी किमतीत उपलब्ध होतील. कोरोनावरील उपचार कमी दरांत मिळतील, असं आवाहन मोदींनी केलं.
“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले
पंतप्रधान मोदींनी युरोपियन युनियनमधील सर्व २७ देशांच्या प्रमुखांनी व्हर्च्युअल बैठकीत सहभाग घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. या बैठकीत भारत आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि दळणवळण क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमधील सहकार्य आणि संबंध नव्या उंचीवर जातील, अशी आशा परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून युरोपियन युनियनमधील अनेक देश कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतात मोलाचं सहकार्य करत आहे. कोरोना लसींचा साठा, वैद्यकीय मदत, ऑक्सिजन पुरवठा अशी सामग्री युरोपातील देशांकडून भारताला पुरवली जात आहे.