CoronaVirus News: मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:29 AM2021-05-22T08:29:30+5:302021-05-22T08:32:09+5:30
CoronaVirus News: पूर्णपणे 'मेड इन इंडिया' लस असलेल्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला धक्का
बंगळुरू: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरण अभियानाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण अभियानात कोवॅक्सिन आणि कोविशील्डचा प्रामुख्यानं वापर केला जात आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लस घेतली आहे का, ही बाब तपासली जाईल. या बाबतीत कोविशील्डला मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोवॅक्सिनला धक्का बसला आहे.
कोरोना उपचारासाठी कोणती लस सर्वात जास्त प्रभावी, कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन? ICMR च्या रिपोर्टमधून खुलासा
लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी जगभरातील अनेक देशांनी प्रवासाचं धोरण जाहीर केलं आहे. यामध्ये कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांचा समावेश करण्यात आलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेकनं केलं आहे. जगभरातील देश लसीकरण झालेल्या प्रवाशांना प्रवेश देण्याआधी काही महत्त्वाच्या निकषांचा विचार करतात. प्रवासी ज्या देशात येत आहे, त्या देशातील नियामक संस्थेनं मंजूर केलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश केलेल्या लसींचे डोस घेतले असल्यासच प्रवेश दिला जातो.
सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या कोविशील्ड, मॉडर्ना, फायझर, ऍस्ट्रोझेनेका, सिनोफार्म/बीबीआयपी, जनसेन (अमेरिका आणि नेदरलँड) यांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापराच्या यादीत केला आहे. मात्र या यादीत अद्याप तरी कोवॅक्सिनचा समावेश झालेला नाही. या यादीत स्वत:चा समावेश करून घेण्यासाठी भारत बायोटेकनं प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मे-जूनमध्ये एक बैठक होईल अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली. भारत बायोटेकनं डोझियर जमा केल्यानंतर या यादीत कोवॅक्सिनचा समावेश करायचा की नाही, याचा विचार होईल. यासाठी काही टप्पे आहेत. प्रत्येक टप्पा पूर्ण करण्यास काही आठवडे लागतात. याबद्दल भारत बायोटेककडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.