CoronaVirus News : न्यूयॉर्कमध्ये जूनमध्ये सुरू होणार उद्योग, टप्प्याटप्प्याने निर्बंध करणार शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:34 AM2020-05-20T00:34:22+5:302020-05-20T00:37:06+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : न्यूयॉर्क शहरासहित त्या राज्यामध्ये तीनलाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर तिथे या साथीमध्ये २८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.
न्यूयॉर्क : कोरोना साथीचा अमेरिकेमध्ये सर्वात मोठा तडाखा न्यूयॉर्कला बसला. या महाभयंकर संकटातून आता हे शहर हळूहळू सावरू लागले असून, येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात न्यूयॉर्कमधील काही उद्योगधंदे सुरू केले जातील. या शहरात लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येतील, असे तेथील महापौर बिल डे ब्लासिओ
यांनी सांगितले.
न्यूयॉर्क शहरासहित त्या राज्यामध्ये तीनलाख ५१ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तर तिथे या साथीमध्ये २८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. महापौर बिल डे ब्लासिओ म्हणाले की, अमेरिकी प्रशासनाने आरोग्य सुरक्षेसंदर्भात आखून दिलेल्या सात नियमांचे पालन केल्यानंतरच न्यूयॉर्कमध्ये कोणतेही उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. कोरोना साथीमुळे अमेरिकी सरकारने लादलेले निर्बंध न्यूयॉर्क प्रांत सरकारने मागे हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोरोना साथीची स्थिती पाहूनच हे निर्बंध सैल केले जातील. तशी प्रक्रिया येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आम्ही पार पाडणार आहोत,असेही महापौर म्हणाले.
मृत्यूचे प्रमाण झाले कमी
न्यूयॉर्क शहरातील उद्योग-व्यवसाय, विविध शासकीय, खासगी कार्यालये, शाळा-महाविद्यालये आम्ही टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करणार आहोत. कोरोना साथीमुळे न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. कोरोना रुग्णांवर नीट उपचार होण्यासाठी न्यूयॉर्क शहरात काही ठिकाणी विशेष रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत.