CoronaVirus News : भयावह! उत्तर कोरियात कोरोनाचा वेग सुस्साट; 1,86,000 नवे रुग्ण, किम जोंग उनचं वाढलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:09 PM2022-05-22T17:09:20+5:302022-05-22T17:22:03+5:30
उत्तर कोरियाने रविवारी जाहीर केलं की तेथे जवळपास 1,86,000 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा सुस्साट वेग पाहायला मिळत आहे. यामुळे किम जोंग उनचं टेन्शन वाढलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी जाहीर केलं की तेथे जवळपास 1,86,000 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तरेकडील अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने, राज्य आपत्कालीन महामारी प्रतिबंधक मुख्यालयातील डेटाचा हवाला देत, 24 तासांच्या कालावधीत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 186,090 हून अधिक लोकांमध्ये तापाची लक्षणे दिसून आल्याची नोंद केली गेली असं म्हटलं आहे.
योनहॅप वृत्तसंस्थेने KCNA च्या हवाल्याने मृतांची संख्या 67 वर गेली आहे. तर मृत्यूदर 0.003 टक्के आहे. KCNA नुसार, 24 मिलियन लोकसंख्येच्या देशात एप्रिल अखेरीपासून तापाचे आकडे 2.64 मिलियनपेक्षा जास्त झाले आहेत, त्यापैकी 2.06 मिलियनहून अधिक लोक बरे झाले आहेत आणि किमान 579,390 लोकांवर उपचार केले जात आहेत. 12 मे रोजी, उत्तर कोरियाने ओमायक्रॉन प्रकाराचे पहिले पुष्टी केलेले COVID प्रकरण सार्वजनिक केले. दुसरीकडे, हुकूमशहा किम जोंग कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे तणावात आहेत. लष्कर तैनात केल्यानंतरही केसेस थांबण्याचे नाव घेत नाहीत.
दुसरीकडे, जागतिक कोरोना विषाणूची प्रकरणे 52.67 कोटींहून अधिक आहेत, तर मृत्यू 62.8 लाख आणि लसीकरण 11.44 बिलियनहून अधिक आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. रविवारी सकाळी आपल्या ताज्या अपडेटमध्ये, विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSSE) ने उघड केले की सध्याची जागतिक प्रकरणे 527,127,837 झाली आहेत, मृत्यूची संख्या 6,288,589 झाली आहे आणि एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या 11,440,859,701 झाली आहे.
CSSE च्या म्हणण्यानुसार, 83,255,845 आणि 1,002,146 वर जगातील सर्वाधिक प्रकरणे आणि मृत्यूसह अमेरिका हा सर्वात जास्त प्रभावित देश आहे. 43,134,135 प्रकरणांसह भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश आहे. 1 कोटीहून अधिक प्रकरणे असलेले इतर देश म्हणजे ब्राझील (30,762,413), फ्रान्स (29,564,005), जर्मनी (26,040,460), यूके (24,366,063), रशिया (18,022,001), दक्षिण कोरिया (17,938,399), इटली (17,229,263), तुर्की (15,062,393), स्पेन (12,234,806) आणि व्हिएतनाम (10,707,568) आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.