CoronaVirus News: जागतिक लसीकरणासाठी अपेक्षेच्या फक्त १०% निधी जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:57 AM2020-08-12T03:57:02+5:302020-08-12T03:57:35+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती; निधी संकलनाच्या दृष्टीने मोठे अपयश पदरी येण्याची चिन्हे

CoronaVirus News Only 10 per cent of expected funds raised for global vaccination | CoronaVirus News: जागतिक लसीकरणासाठी अपेक्षेच्या फक्त १०% निधी जमा

CoronaVirus News: जागतिक लसीकरणासाठी अपेक्षेच्या फक्त १०% निधी जमा

googlenewsNext

जिनिव्हा : जगातील विविध देशांनी एकत्रितपणे कोरोना महामारीविरुद्धची लस विकसित करून ती जगातील सर्व देशांमध्ये सर्वांना समन्यायी पद्धतीने उपलब्ध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हाती घेतलेल्या कार्यक्रमास निधी संकलनाच्या दृष्टीने मोठे अपयश पदरी येण्याची चिन्हे आहेत.

जगातील सर्वांना कोरोनाच्या चाचण्या, त्यावरील उपचार व लस जलदगतीने उपलब्ध व्हावी यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने गेल्या एप्रिलमध्ये ‘अ‍ॅसेस टू कोविड-१९ टूल्स’ (एसीटी) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. यातील लस विकसित करण्याचा हिस्सा ‘कोवॅक्स’ या नावाने ओळखला जातो. खासकरून लस विकसित करणे, ती तयार झाल्यावर तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे व तिचे सर्वांना समन्यायी पद्धतीने वितरण करणे, हा त्यामागचा प्रमुख हेतू होता. त्यासाठी सदस्य देशांनी स्वेच्छेने निधी द्यावा, अशी अपेक्षा होती.

‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक डॉ. तेद्रॉस घेब्रियेसस यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, निदान निधी उभारण्याच्या बाबतीत तरी या कार्यक्रमास समाधानकारक यश आल्याचे दिसत नाही. १०० अब्ज डॉलर सर्व देशांकडून मिळून जमा होतील, अशी अपेक्षा होती; पण त्यापैकी आतापर्यंत जेमतेम १० टक्के रक्कम जमा झाली आहे.

ते म्हणाले की, १०० अब्ज डॉलर ही रक्कम नक्कीच मोठी आहे; परंतु या महामारीमुळे विस्कळित झालेल्या अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत २० देशांनी (जी-२० गटातील देश) याच्या दसपट रक्कम खर्च केली हे लक्षात घेता १०० अब्ज डॉलर उभे राहणे अशक्य मात्र नाही. (वृत्तसंस्था)

उत्पादन हेच मोठे आव्हान
लस विकसित झाली तरी जगभर पुरविता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिचे उत्पादन करणे व कोरोना महामारीला परिणाकारक व त्वरेने आळा बसेल अशा पद्धतीने तिचे जगाच्या विविध भागांत वितरण करून प्रत्यक्ष व्यापक लसीकरण करणे हे ‘डब्ल्यूएचओ’पुढील दुसरे मोठे आव्हान आहे.

जगभरात कोरोना लस विकसित करण्याचे शेकडो प्रयोग सुरू आहेत. त्यातील सुमारे ३० संभाव्य लसी प्रत्यक्ष माणसांवर चाचण्या करून पाहण्याच्या विविध टप्प्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत नाही तरी निदान पुढील वर्षाच्या सुरुवातीस तरी लस प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल, असे मानले जात आहे.

2021 च्या अखेरपर्यंत ‘कोवॅक्स’ कार्यक्रमाच्या अंतर्गत लसीच्या किमान दोन अब्ज डोसचे उत्पादन करून त्याचे वितरण प्रामुख्याने मध्यम व निम्न उत्पन्न गटातील देशांना करण्याचा संघटनेचा विचार आहे.
स्वतंत्रपणे लस विकसित करून तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची बहुतांश देशांची ऐपत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील सामूहिक प्रयत्नांतून हे काम करायचे, अशी ही योजना आहे.
जे देश यासाठी निधी देतील त्यांना या प्रयत्नांतून विकसित होणारी लस अग्रक्रमाने उपलब्ध करून दिली जाईल.

Web Title: CoronaVirus News Only 10 per cent of expected funds raised for global vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.