CoronaVirus News: कोरोनाचा जन्म कसा झाला? वैज्ञानिकांना सापडला महत्त्वाचा पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:28 PM2021-07-06T22:28:07+5:302021-07-06T22:29:41+5:30
CoronaVirus News: कोरोनाची उत्पत्ती नेमकी कशी झाली?; लॅन्सेटमध्ये शास्त्रज्ञांचा लेख
नवी दिल्ली: चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. वुहानमधूनच कोरोनाचा विषाणू जगभरात पसरला. कोरोनाचा जन्म झाला कसा, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या उगमावरून संपूर्ण जग चीनकडे संशयानं पाहत आहे. मात्र अद्याप तरी शास्त्रज्ञांना याबद्दलचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. कोरोना विषाणूची उत्पत्ती नैसर्गिक असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.
चीनच्या एका प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू तयार करण्यात आला आणि तिथून तो वातावरणात पसरला याची साक्ष देणारे कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नसल्याचं शास्त्रज्ञांच्या एका गटानं लॅन्सेट नियतकालिकेतील लेखात म्हटलं आहे. सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला. जगभरातील दोन डझन जीवतज्ज्ञ, महामारी तज्ज्ञ, डॉक्टर, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि प्राण्यांचे डॉक्टर यांनी मिळून हा अहवाल तयार केला आहे.
शास्त्रज्ञांचं म्हणणं काय?
कोरोना विषाणूची निर्मिती निसर्गातच झाल्याचे ठोस पुरावे संशोधनातून मिळाले आहेत. कोरोना विषाणूची निर्मिती एका प्रयोगशाळेत करण्यात आली, याबद्दल कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत, असं लेखकांनी नियतकालिकेतील लेखात नमूद केलं आहे. शास्त्रज्ञांच्या याच गटानं गेल्या वर्षीदेखील लॅन्सेटसाठी लेख लिहिला होता. त्यातही त्यांनी प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर पडल्याची शक्यता फेटाळून लावली होती. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी अधिक संशोधन करण्याची मागणी जगभरातून होत असताना हा अहवाल समोर आला आहे.