CoronaVirus News : रुग्ण दगावण्याचा धोका रेमडेसिव्हिरमुळे होतो कमी, चाचण्यांतील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 01:20 AM2020-07-12T01:20:10+5:302020-07-12T06:40:01+5:30
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना १० दिवस रेमडेसिव्हिर औषध देण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर बरी झाल्याचे आढळून आले.
वॉशिंग्टन : कोरोना संसर्गामुळे रुग्ण मरण पावण्याचा धोका रेमडेसिव्हिर औषधामुळे कमी होतो असे औषधाची उत्पादक कंपनी गिलिड सायन्सेसने म्हटले आहे. या औषधाचा आणखी फायदा जाणून घेण्यासाठी आणखी सखोल संशोधन करावे लागेल, असेही या कंपनीने म्हटले आहे.
कोरोना संसर्गावर अद्याप प्रभावी लस किंवा औषध सापडलेले नाही. मात्र रेमडेसिव्हिर हे औषध दिले असता, त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते, असे चाचण्यांतून आढळून आले होते. यामुळे या औषधाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कंपनीने म्हटले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना १० दिवस रेमडेसिव्हिर औषध देण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर बरी झाल्याचे आढळून आले.
कोलंबिया विद्यापीठामधील शास्त्रज्ञ डॉ. सुसान ओलेंडर यांनी सांगितले, कंपनीने या औषधाबाबत केलेल्या चाचण्या आश्वासक आहेत. मात्र पीटर्सबर्ग विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलचे प्राध्यापक डॉ. वालिद गेलाड म्हणाले, औषधाच्या विविध प्रकारे चाचण्या करण्यात येतात. एकाच प्रकारे केलेल्या चाचणीच्या निष्कर्षांवर अवलंबून राहाणे योग्य नाही. रेमडेसिव्हिर औषध दिलेल्या रुग्णांपैकी फक्त ७.४ टक्के लोक मरण पावले होते. हे औषध दिले नाही त्या रुग्णांपैकी १२.५ टक्के लोकांचा मृत्यू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.