CoronaVirus News: ऑक्सफर्डहून आली 'लय भारी' बातमी; यशस्वी होतेय कोरोना लसीची मानवी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 08:06 PM2020-07-20T20:06:58+5:302020-07-20T20:18:54+5:30
ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचं समोर आलंय
लंडन: जगातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जगात सुरू आहेत. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं मानवी चाचण्यांमधून समोर आलं आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस पूर्णपणे यशस्वी ठरल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होईल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं या लसीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा करार केला आहे. त्यामुळे या लसीचं उत्पादन भारतात होईल. त्या दृष्टीनं आवश्यक असलेली मानवी चाचणी पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सीरमकडून देण्यात आली आहे.
Oxford’s Covid-19 vaccine produces a good immune response, reveals new study.
— University of Oxford (@UniofOxford) July 20, 2020
Teams at @VaccineTrials and @OxfordVacGroup have found there were no safety concerns, and the vaccine stimulated strong immune responses: https://t.co/krqRzXMh7Bpic.twitter.com/Svd3MhCXWZ
ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या कोरोना लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. शेकडो जणांना ही लस टोचण्यात आली. त्यातून समोर आलेले निष्कर्ष दिलासादायक असल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटनं दिली आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीला शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लॅन्सेटनं म्हटलं आहे. सध्या तरी या लसीचे कोणतेही गंभीर साईड इफेक्ट्स दिसले नसल्याचं लॅन्सेटनं सांगितलं आहे.
१८ ते ५५ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात आल्यावर त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून मिळालेला प्रतिसाद चांगला आहे, अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या जेन्नर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ऍड्रियन हिल यांनी दिली. विषाणूचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती करण्याचं काम लस करत आहे. यासोबतच लसीची शरीरातील टी-सेल्ससोबत रिऍक्शन होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यात मदत होते, असं हिल्स यांनी सांगितलं.
Just added to The Lancet's #COVID19 Resource Centre—Safety and immunogenicity of two COVID-19 vaccine trials: ChAdOx1 https://t.co/qzlBcVGaGj and adenovirus type-5 vectored https://t.co/X0TmwFTxBd plus linked Comment https://t.co/wAfiTSqAEUpic.twitter.com/3eEANYlvpa
— The Lancet (@TheLancet) July 20, 2020
ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकट्या अमेरिकेत या लसीची चाचणी जवळपास ३० हजार लोकांवर करण्यात आली आहे. ही लस जगभरात वापरली जाऊ शकते का, याची माहिती येत्या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल, असा अंदाज हिल यांनी वर्तवला. या लसीची चाचणी घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरात कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या शरीरात इतक्याच अँटीबॉडीज तयार होत असल्याचं हिल यांनी सांगितलं.
भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटची भूमिका महत्त्वाची ठरणार
ऑक्सफोर्ड विद्यापीठ अस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोरोनाची लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या या लसीच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी सीरमला डीजीसीआयनं परवानगी दिली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लसीची मानवी चाचणी सध्या सुरू आहे. ही लस दुहेरी ढाल म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सफर्डनं निर्माण केलेली कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज आणि टी सेल्स तयार करेल. लसीमुळे शरीरात गेलेल्या अँटीबॉडीज काही महिन्यांत नष्ट होतील. मात्र टी सेल्स काही वर्षे कायम राहतील, असं प्राथमिक चाचण्यांमधून दिसून आलं आहे.
लस सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार
ऑक्सफर्डनं कोरोनावरील लस शोधल्यास सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तिचं उत्पादन सुरू करण्यात येईल. मात्र ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत बराच कालावधी जाईल, असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. 'कोरोनावरील लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागेल. त्यातही परवाना मिळालेली पहिली लस सर्वोत्तम असेलच असं नाही', असं पूनावाला यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितलं.
...म्हणून सर्वांना लस मिळेपर्यंत बराच वेळ लागणार; सीरमच्या पूनावालांनी सांगितली मोठी अडचण