CoronaVirus News: कृत्याची शरम वाटली पाहिजे, चीनवरून डोनाल्ड ट्रम्प यांचं WHOवर तोंडसुख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:47 AM2020-05-02T04:47:26+5:302020-05-02T04:48:00+5:30
तसेच या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधीही ट्रम्प यांनी रोखला आहे.
वॉशिंग्टन : चीनची जनसंपर्क संस्था (पीआर एजन्सी) असल्यासारखे वागणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला या कृत्याची शरम वाटली पाहिजे, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका दरवर्षी ५० कोटी डॉलर तर चीन फक्त ३८ लाख डॉलरचा निधी देते. या गोष्टीचा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे उल्लेख केला होता. कोरोना साथीच्या काळात चीनला झुकते माप देणारी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने घेतल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तसेच या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधीही ट्रम्प यांनी रोखला आहे.
आपल्या निर्णयाचे समर्थन करताना ट्रम्प यांनी सांगितले की, एखाद्याने भयंकर चूक केल्यास त्याला पाठीशी घालणे योग्य नाही. चीनमधून फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर धुमाकूळ घातला असून, दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. एखाद्याच्या चुकीमुळे जर अनेकांचा जीव जात असेल तर त्या कृत्याचा संबंधितांना जाब विचारायलाच हवा. पण जागतिक आरोग्य संघटनेने असे काहीही केले नाही. चीनच्या बाजूने बोलत राहाण्यात या संघटनेने धन्यता मानली.
चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा आरोप काही देशातील शास्त्रज्ञांनी केला होता. चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्भव कसा झाला व ती साथ जगभरात कशी पसरली याचा अमेरिका सखोल तपास करत आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी सांगितले होते.
>अमेरिका नाराज
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने तटस्थ भूमिका घेऊन कोरोना साथीच्या स्थितीकडे पाहायला हवे होते. चीनकडून किती मोठी चूक झाली आहे हे जाणवूनही या संघटनेने त्या देशाला खडसावले नाही. ही गोष्ट अमेरिकेला खटकली आहे. आम्ही खूप नाराज आहोत असेही ट्रम्प यांनी सांगितले.