CoronaVirus News : वन्यप्राण्यांच्या भक्षणावर चीनच्या वुहानमध्ये बंदी; खवय्यांच्या यादीतून सिंह, वाघ, मोर, खवले मांजर होणार गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 02:05 AM2020-05-23T02:05:50+5:302020-05-23T02:06:17+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातील एका प्राणी बाजारातून कोरोना विषाणूचा माणसाला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. वटवाघळातून हा विषाणू माणसामध्ये शिरला असेही मानले जाते.
वुहान : जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उगम जिथून झाला त्या चीनमधील वुहान शहरात आता वन्यप्राण्यांचे भक्षण करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सिंह, वाघ, मोर, खवले मांजर असे अनेक वन्यप्राणी आता चिनी खवय्यांच्या यादीतून कटाप होणार आहेत.
चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातील एका प्राणी बाजारातून कोरोना विषाणूचा माणसाला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येते. वटवाघळातून हा विषाणू माणसामध्ये शिरला असेही मानले जाते. मात्र कोरोना विषाणू चीनने वुहानमधील प्रयोगशाळेत निर्माण केला असून, त्याचे ठोस पुरावे आमच्या हाती लागले आहेत, असा दावा अमेरिकेच्या काही नेत्यांनी केला होता. हा आरोप चीनने नाकारला असून त्या देशाची अमेरिकेशी सध्या कोरोना साथीच्या मुद्द्यावरून रोज खडाजंगी सुरू असते. कोरोनाच्या साथीबाबत खरी माहिती चीनने दडवून ठेवली व त्यामुळे त्याचे अतिशय भीषण परिणाम जगाला भोगावे लागले, असा आरोप अमेरिकेसह युरोपीय देशांनी केला होता.
वुहानमधून कोरोनाची साथ कशी पसरली याची आता जागतिक स्तरावरील अनेक देश संयुक्त चौकशी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावध झालेल्या चीनने काही दिवसांपूर्वी वुहानमधील प्राणी बाजार बंद केला व आता तेथील नागरिकांना वन्यप्राणी खाण्यास बंदी केली आहे. अनेक वन्यप्राण्यांचा संकर घडवून त्यांची विक्री करण्याचा उद्योग चीनमधील अनेक शेतकरी करतात. त्यांनी हा उद्योग बंद करावा असा आदेश आता चीन सरकारने दिला आहे. या शेतकऱ्यांना चीन सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
हुनान व जिआंगक्सी या दोन प्रांतांमध्ये अशा शेतकºयांची संख्या अधिक आहे. वन्यप्राण्यांचा संकर घडवून त्यांची विक्री खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याकरिता केली जात असे. त्या व्यवसायातून दरवर्षी १० अब्ज युआनची आर्थिक उलाढाल होते. आता बंदीमुळे या सर्व व्यवहारांवरच गदा आली आहे.