coronavirus: कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वपूर्ण माहिती
By बाळकृष्ण परब | Published: October 3, 2020 10:38 PM2020-10-03T22:38:13+5:302020-10-03T22:39:51+5:30
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने पुढचे ४८ तास महत्त्वपूर्ण आहेत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त सीएनएन या वृत्तवाहिनीने दिले आहे.
BREAKING: The next 48 hours will be critical for Trump as he fights Covid-19, a source familiar with the President's health tells reporters https://t.co/AEuZYeIzfspic.twitter.com/d8Q4jApU1i
— CNN (@CNN) October 3, 2020
सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर क्वारंटाईन झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचे म्हटले होते.
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी निवडणूक डिबेट दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर टीका करताना गरज भासली तरच मास्क घालेन, असे सांगितले होते. तसेच अनेकदा त्यांनी जाहीररित्या मास्क घालणार नाही असे म्हटले होते.
कोरोनावरून बायडन यांच्यावर टीका
दोन्ही नेत्यांच्या डिबेटवेळी ट्रम्प म्हणाले की, जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत झाले असते. यावर बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प यांच्याकडे आताही कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोणताही प्लॅन नाहीय, त्यांनी केवळ वाट पाहिली आहे. त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, ज्याचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. यावेळी ट्रम्प यांनी भारताला चीन आणि रशियाच्या पंक्तीत बसवत त्या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना मृतांचा आकडा लपविल्याचा आरोप केला होता.
भारतावर केले होते आऱोप आरोप
महत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतात जेव्हा लॉकडाऊनची गरज होती तेव्हा ट्रम्प यांच्यासाठीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे आरोप होत आहेत. अशावेळी ट्रम्प यांनी भारतावरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली होती.