Coronavirus: कोरोनाचा कठीण टप्पा पार, कधीही करु शकतो मात; नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांची मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:02 PM2020-03-26T13:02:59+5:302020-03-26T13:03:09+5:30
चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,७१,९४० वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या २१,२४६ इतकी झाली आहे. जगभरातील १८१ देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,२६,३४० पेक्षा अधिक तर बळींची संख्या १२,७१९ इतकी आहे. आशियात ९९,८०५ रुग्ण आहेत तर ३,५९३ बळी गेले आहेत. मात्र आता कोरोनाचा कठीण टप्पा आपण पार केला असून आता आपण कोरोनावर कधीही मात करु शकतो असं भाकित नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी केलं आहे.
नोबेल पारितोषिक विजेते आणि स्टॅनफोर्ड बायोफिझिक तज्ञ मायकल लेव्हिट यांनी कोरोनाबाबत एक भविष्यवाणी केली आहे. मायकल लेव्हिट यांनी भविष्यवाणीमध्ये सांगितले आहे की, कोरोनामुळे २१ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असला तरी १ लाखपेक्षा जास्त रुग्ण निरोगी देखील झाले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी चीनला बराच काळ लागेल असा अनेक आरोग्य तज्ञांनी दावा केला होता. मात्र गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच आता तर चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही असा दावा चीनने केला आहे. त्यामुळे परिस्थिती जितकी भीतीदायक वाटत आहे तेवढी नाही असं मत मायकल लेव्हिट यांनी व्यक्त केले आहे. मायकल लेव्हिट यांनी केलेल्या भाकितमुळे जगभरातील कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसचे ४ लाख ७१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत तर २१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, ब्रिटन, अमेरिका यासारख्या प्रगत देशांनाही मोठा फटका बसला आहे.