CoronaVirus: विषाणू मुद्दाम तयार केलेला नाही!; ‘डब्ल्यूएचओ’चे ठाम मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:09 AM2020-04-23T02:09:10+5:302020-04-23T07:07:24+5:30
उगम प्राण्यांमधूनच झाल्याचे स्पष्टीकरण
जीनिव्हा : सध्या संपूर्ण जगात थैमान घालणारी ‘कोविड-१९’च्या साथीला काणणीभूत असलेल्या कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये प्राण्यांमधूनच झाला व हा विषाणू जनुकीय गुणसूत्रांत मुद्दाम फेरबदल करून प्रयोगशाळेत तयार केलेला नाही, असे ठाम प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केले आहे.
माध्यमांसाठी घेतलेल्या व्हिडीओ ब्रीफिंगमध्ये संघटनेच्या प्रवक्त्या फादेला चैब म्हणाल्या, की सर्व उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसते, की हा विषाणू प्राण्यांमधून आला आहे व तो प्रयोगशाळेत अथवा अन्यत्र मुद्दाम तयार केलेला नाही. हा विषणू प्राणिजन्य असल्याची शक्यता अधिक प्रबळ आहे.
चैब पुढे म्हणाल्या, की प्राण्यांच्या सजीव साखळीतील मधले टप्पे गाळून हा विषाणू माणसापर्यंत कसा आला, हे मात्र स्पष्ट नाही. पण, त्याच्या उगमस्थानापासून माणसापर्यंतच्या प्रवासात कोणा तरी अन्य प्राण्याच्या माध्यमातून तो आला, हे मात्र नक्की. अशा प्रकारेच विषाणू वटवाघळांमध्ये असतात, हे माहीत आहे. पण, वटवाघळांपासून निघून आणि स्वरूपात बदल होऊन हा विषाणू माणसापर्यंत कसा पोहोचला, हे ठरविण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. (वृत्तसंस्था)
शंका, आरोप आणि खंडन
या साथीची सुरुवात गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या ज्या वुहान प्रांतात झाली, तेथीलच वुहान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये चीनच्या लष्कराने जैविक अस्त्रांसाठीच्या प्रयोगांचा एक भाग म्हणून जैविक गुणसूत्रीय फेरबदल करून हा नवा विषाणू तयार केला व तेथून तो निष्काळजीपणाने बाहेर पडला, असे आरोप केले जात आहेत. चीन सरकारने व वुहान इस्टिट्यूटनेही याचा ठामपणे इन्कार केला आहे. तरीही, खासकरून अमेरिकेन ही शंका घेणे सोडलेले नाही. ट्रम्प प्रशासनाने याबद्दल चीन सरकारला औपचारिकपणे जाब विचारला नसला, तरी अमेरिकेतील मिसुरी राज्याने याच मुद्द्यावर तेथील संघीय न्यायालयात चीनविरुद्ध भरपाईचा दावा दाखल केला आहे. चीन सरकारच्या प्रवक्त्याने या दाव्याला कोणताही वस्तुनिष्ठ किंवा कायदेशीर आधार नाही व तो मूर्खपणाशिवाय दुसरे काही नाही, असे म्हणून त्याची खिल्ली उडविली.