Omicron: बूस्टर डोस घेतलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण; कोरोनानं वाढवलं जगाचं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 01:25 PM2021-12-10T13:25:10+5:302021-12-10T13:25:44+5:30
Coronavirus Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून बचावासाठी नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातच सिंगापूरमधून आलेल्या बातमीनं चिंता वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशात चिंता वाढली आहे. कोरोनच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट कमी धोकादायक असला तरी त्याचा संसर्ग दहापट जास्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवघ्या आठवडाभरात दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णसंख्या लाखांवर पोहचली आहे. भारतातही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून बचावासाठी नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातच सिंगापूरमधून आलेल्या बातमीनं चिंता वाढली आहे. सिंगापूर इथं बूस्टर डोस घेतलेल्या २ नागरिकांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. विमानतळावर तपासणी करताना २४ वर्षीय युवतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली. तर ६ डिसेंबरला जर्मनीहून आलेल्या एका प्रवाशामध्ये ओमायक्रॉन आढळला आहे. या व्यक्तीनेही कोविड लसीचे तिसरा डोस घेतला होता.
सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, संपूर्ण जगात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार पाहता देशात आणखी काही रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉन लक्षणं आढळताच दोन्ही रुग्णांना कोविड सेंटरला पुढील उपचारासाठी ठेवलं आहे. तर या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांनाही १० दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला लस बनवणाऱ्या फायझर आणि बायोटेकनं सर्च रिपोर्टचा हवाला देत ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यासाठी तिसऱ्या डोसची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. औषध निर्मात्या कंपन्यांनी सांगितले की, कोरोना लसीचा तिसरा डोस घेणारे लोक दोन डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत ओमायक्रॉन २५ टक्के जास्त प्रतिकार करू शकतात.
सिंगापूरमध्ये ८७ टक्के लोकांनी घेतली लस
सिंगापूर हा जगातील सर्वात जास्त लसीकरण अभियान राबवणाऱ्या देशांपैकी एक आहे. याठिकाणी ८७ टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर २९ टक्के लोकांना लसीचा बूस्टर डोसही देण्यात आला आहे. सरकार लवकरच ५ वर्षावरील मुलांना कोरोनाची लस देण्याची तयारी करत आहे.
लाट आली तरी...
अफ्रिकेत चौथी लाट येण्याचा धोका व्यक्त होत आहे. भारतातही जानेवारीत लाट येईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. ओमायक्रॉनमुळे लाट आली तरीही ती फार धोकादायक नसेल, दुसऱ्या लाटेसारखी जीवघेणी नसेल असेच सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे. कारण या विषाणूमुळे कोरोना झाला तरी लक्षणे मात्र सौम्य आहेत. अनेकांवर घरीच उपचार सुरू आहेत.